
Waiting for rain : दिनांक २१ जुलै २०२५ अखेर महाराष्ट्रात खरीप हंगामात एकूण १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित पेरणी होती. यापैकी १२७.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली असून, हे प्रमाण सरासरीच्या ८८ टक्के आहे. यामध्ये ऊसाचा समावेश केल्यास राज्यात एकूण १५७.४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १२८.७८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ८२ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ८३ टक्के होते, म्हणजेच यंदा किंचित घट झाली आहे.
पिकानुसार आढावा घेतल्यास, यंदा सर्वाधिक पेरणी सोयाबीन या पिकाची झाली असून ती ४६.७३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. याशिवाय कापसाची पेरणी ३७.४४ लाख हेक्टरवर झाली असून हे देखील मागील वर्षाच्या तुलनेत घटलेले क्षेत्र आहे. मक्याची पेरणी मात्र लक्षणीय वाढ दर्शवते. यंदा १३.३६ लाख हेक्टरवर मका पेरण्यात आला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३३ टक्क्यांनी जास्त आहे. तूर, मूग, उडीद आणि इतर कडधान्यांची पेरणी समाधानकारक असून ती ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. तेलबिया पिकांत सोयाबीन व्यतिरिक्त भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल यांची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत घटली आहे.
ऊस लागवडीचा विचार केला असता, यंदा केवळ १.३९ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली असून हे प्रमाण सरासरीच्या केवळ ११ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण १.४७ लाख हेक्टर होते.
पावसाच्या बाबतीत, राज्यात १ जून ते २१ जुलै २०२५ या कालावधीत ३७७.९ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे, जो सामान्याच्या ८७.५ टक्के इतका आहे. मागील वर्षी या कालावधीत ५१७.४ मिलिमीटर पाऊस पडला होता, जो सरासरीच्या ११९ टक्क्यांहून अधिक होता. म्हणजेच यंदा राज्यात एकूण पर्जन्यमान मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
पावसाच्या वितरणाचा विचार करता, पुणे, सांगली, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, कोल्हापूर, पालघर, रायगड, सातारा, चंद्रपूर अशा भागांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. परंतु बीड, नांदेड, परभणी, लातूर, जळगाव, सोलापूर, अमरावती या भागांत अजूनही सरासरीच्या ५० ते ७५ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात मात्र केवळ २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाल्यामुळे तेथील पेरणी आणि पिकांची स्थिती चिंतेची आहे.
अमरावती विभागात १९ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाल्याची नोंद असून, अजून २३ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की, काही भागात समाधानकारक पावसामुळे पेरणीत चांगली प्रगती झाली असली, तरी काही भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.