राज्य शासनाकडून गाईच्या दुधासाठी प्रति लिटर जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा दूध संघाच्या दूध उत्पादकांना महिन्याला 17 कोटी 75 लाख रुपयांचा फायदा होणार आहे.
गोकुळ कडे दिवसाला आठ लाख लिटर तर वारणा संघाकडे साडेतीन लाख लिटर गाईचे दूध संकलित होत आहे. एक जानेवारी दोन हजार चोवीस ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत संकलित दुधाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
गाय दूध दर अचानक कोसळल्याने राज्यात उत्पादकांनी आंदोलन केले होते. त्याच दरम्यान सरकारने गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडून दिवसाला आठ लाख लिटर दूध आणि वारणा दूध संघाकडून प्रतिदिन तीन लाख 50 हजार लिटर दूध संकलित होते . याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे उत्पादकांना दिवसाला 40 लाख, दहा दिवसांना चार कोटी आणि महिन्याकाठी 12 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
राज्यातील दूध संघासह गोकुळ आणि वाराणाने गाय दुधाचे दर कमी केले होते . यामुळे जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांनी आंदोलने केली. रस्ता रोको करून शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न एरणीवर आणला . एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे गाय दूध दर कमी झाल्याने दुभती जनावरे विकण्याची वेळ आली होती. शासनाने दोन महिन्यांसाठी दिलासा दिला. याचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील उत्पादकांना होणार आहे.
…असे मिळणार अनुदान
◼️ गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान
◼️ पहिल्या टप्प्यात १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागू
◼️ दूध संस्थांनी ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफच्या दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणे बंधनकारक
◼️ शासनाचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार.
हा मुद्दा अडचणीचा
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड आणि पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांनी अशी आधार कार्ड लिंक केलेली आहेत त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही, परंतु ज्यांच्याकडे पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा अडचणी ठरणार आहे.












