अयोध्येतील राममुर्तीच्या प्रतिष्ठापना दिनाच्या मुहूर्तावर राज्यामध्ये शेती व्यवसायात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा श्री गणेशा करण्यात आला. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची काल पहिली खुडणी झाली. थेट शेतातच या वाणांच्या द्राक्षांची विक्री व ऑनलाईन लिलाव करण्यात आला. तर नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांची 2 टनाहून अधिक विक्री झाली. या द्राक्षांचा थेट शेतात लिलाव झाल्यामुळे हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.
राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या शेतात यावेळी आरा रंगीत द्राक्ष वाणाची पाहणी व विक्री करण्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यामधील द्राक्ष उत्पादक आणि खरेदी व्यापाऱ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लिलावा मध्ये 2 टन द्राक्षमाल विकला गेला. या शिवाय अवघ्या 2 तासात 336 किलो द्राक्षांची खरेदी करीत जिल्ह्यातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विलास शिंदे यांनी यावेळी सांगितले कि,यापुढील काळात ही ऑनलाईन लिलाव व खरेदी विक्री प्रक्रिया अधिक गतिशील व पारदर्शक करण्यात येईल .
ऑनलाईन लिलावाचा एक नवीन उपक्रम.
पेटंट द्राक्ष वाणांची चव अधिक चांगली असल्यामुळे ,तसेच त्याची टिकवण क्षमता सरस असल्यामुळे देशातील व्यापारी खरेदीसाठी आतुर असल्याचे दिसून आले. या वाणांची खरेदी करण्यासाठी तयार असलेल्या देशातील लुधियाणा, मुंबई, गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद ,काठमांडू, सिलिगुडी, येथील खरेदीदार व्यापाऱ्यांना या वाणांची व लिलावाची माहिती अगोदर देण्यात आली होती. त्यामुळे कॉन्फरन्स कॉल द्वारे देशाच्या विविध भागातील खरेदीदारांनी यावेळी लिलावात सहभाग नोंदवला. यावेळी 1250 रुपये दर द्राक्षाच्या 4.8 किलोच्या पेटीला मिळाला.
येत्या 26 जानेवारीला नव्या वाणांची पुढील विक्री ..
येत्या 26 जानेवारीला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोने येथे भास्कर कांबळे यांच्या मळ्यात नव्या आरा रंगीत द्राक्ष वाणांची दुसरी पाहणी व विक्री होणार आहे. द्राक्ष खरेदी व विक्री चा लाभ शेतकरी व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गोड, रसाळ चवीचे उत्तम द्राक्षवाण आणि सरस मार्केटींग या दोन गोष्टींच्या जोरावर शेतीत क्रांती घडतांना दिसत आहे. असे यावेळी उपस्थित असलेले राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले.
हे काम तरुण ध्येयवादी शेतकऱ्यांनी गतीने पुढे न्यावे.‘‘ , ‘पेटंट वाणांमुळे दर्जेदार द्राक्ष वाणांचा शेतकऱ्यांचा वनवास संपला आहे असे आता नक्कीच म्हणता येईल, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष यावेळी कैलास भोसले म्हणाले, खरी समस्या मार्केटची होती. त्यावरही ‘ऑनलाईन लिलावा’चा पर्याय उभा राहत आहे. ही आशादायी बाब आहे. सह्याद्रीचा हा उपक्रम राज्यातील फळशेतीसाठीही पथदर्शी ठरणार आहे.’’