पुणे : राज्यात गोवंशीय पशुधनात लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंगळवार (ता.२७) अखेर ३० हजार ५४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ दिवसांत ७६ हजार ९८० जनावरे बाधित झाली असून, ६ हजार २१८ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. जनावरांच्या मृत्यू संख्येत गेल्या महिन्याच्या तुलनेत हलकी घट झाली असली, तरी १०१ टक्के लसीकरण झालेले असताना मृतांची संख्या बघता स्थिती अद्याप गंभीर असल्याचेच चित्र समोर आले आहे.
राज्यात लम्पी स्कीन रोगाचा फैलाव आणि प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर राज्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. फैलाव रोखण्यासाठी पशुधनाची वाहतूक, बाजार, एकत्रित चराई आणि सार्वजनिक पाणवठ्यावरही बंदी घालण्यात आली होती. ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान राबविण्यात आल्याने लम्पी स्कीनची साथ आटोक्यात ठेवण्यात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
परंतु अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुधन मृत झाल्याच्या तक्रारीदेखील पशुपालकांनी केल्या होत्या. तर अनेक ठिकाणी अद्याप मृत पशुधनाचे पंचनामे होणे शिल्लक असून, यामध्ये लम्पी स्कीन आजारानेच पशुधन मृत झाले असल्याचे अहवाल शिल्लक असल्याने पशुपालक नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. राज्य सरकारकडून ३४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे.
सर्वाधिक मृत्यू बुलडाणा, नगरला : ‘लम्पी स्कीन’मुळे राज्यात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात ४ हजार ७०४, तर नगर जिल्ह्यात ३ हजार ६६७ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सर्वांत कमी मुंबई मध्ये शून्य तर गडचिरोली ३ पशुधन मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे.
साथ नियंत्रण; विभागाचा दावा : मृत पशुधनाच्या नुकसान भरपाई पोटी ४७ कोटी ४९ लाख ९९ हजार ७२५ रुपयांचा निधी पशुपालकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यापैकी ३४ कोटी ७६ लाख २२५ रुपये नुकसान भरपाई वाटपाविना शिल्लक असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आली. तर राज्यातील १०० टक्के गोवंश पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असून, साथ नियंत्रणात आल्याने गोवंशाचे बाजारदेखील सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बाधित जनावरे — ४ लाख १३ हजार ९३८
बरे झालेले पशुधन — ३ लाख ३८ हजार ७१४
आतापर्यंत मृत्युमुखी — ३० हजार ४५
लस मात्रा उपलब्ध — १ कोटी ४६ लाख ८१ हजार ८००
झालेले लसीकरण — १ कोटी ४१ लाख १३ हजार ८३
एकूण लसीकरण — १०१ टक्के
जिल्हानिहाय मृत पशुधन संख्या
मुंबई —००
ठाणे — ८४
पालघर — ३
रत्नागिरी — १८९
सिंधुदुर्ग — ३९
नाशिक — १२२
धुळे — १६१
नंदुरबार — २४९
जळगाव — २५९५
नगर — ३६६७
पुणे — ८३३
सातारा — १३०१
सांगली — १२५४
सोलापूर — २६७७
कोल्हापूर — ६५७
औरंगाबाद — १०१६
जालना —९६६
परभणी — २४०
बीड — ११०१
लातूर — २७८
उस्मानाबाद — २७३
नांदेड — ३७३
हिंगोली — १६३
अमरावती — २६६१
अकोला — २१७५
वाशीम — ८२१
बुलडाणा — ४७०४
यवतमाळ — ८०२
नागपूर — २५९
वर्धा — २०१
भंडारा — ११०
गोंदिया — १४
चंद्रपूर — २७
गडचिरोली — ३