Seed quality : महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा..

Seed quality : केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्युआर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या खरीप हंगामात महाबीज चे सर्व प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टल मधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅग वर साथी पोर्टलचा क्यू आर कोड असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेल स्त्रोत बियाणे कोठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हे बियाणे १००% शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यस्तरीय खरीप २०२५ हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमते (treaceability) करिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्व अधोरेखित केले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असे सांगितले आहे.

खरीप २०२५ हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळेत बियाणे पुरवठा करण्याकरिता महाबीजने चोख नियोजन केले आहे. यंदा मान्सुन लवकर येण्याची चिन्हे असल्याची पार्श्वभुमी लक्षात घेऊन. बियाणे पुरवठयाचे कार्य सुरू झाले आहे. काही वाणांच्या बियाणेची अतिरिक्त मागणी झाल्यास ते सुद्धा बियाणे उपलब्ध करून देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाबीजमार्फत एकूण अडीच लाख क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी ७१००० क्विंटल बियाण्याची मात्र ही विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधन केलेल्या वाणांची असणार आहे.

याशिवाय राज्य बियाणे महामंडळ म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांमध्ये देखील महाबीज बियाणे पुरवठा करते. या वर्षी सुद्धा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत विविध पिकातील नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दरांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात तूर रु. १३० प्रति किलो, मूग दर रु. १४० प्रति किलो, उडीद दर रु. १३५, धान (भात) वाणांनुसार रु. ३० ते ४० प्रति किलो, संकरीत बाजरा दर रु १५० प्रति किलो, सुधारित बाजरा दर रु ७० प्रति किलो, नाचणी दर रु. १०० प्रति किलो या अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे.

याशिवाय पूर्वीची ग्राम बीजोत्पादन योजना आता राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक या नावाने येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी पर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ एकर क्षेत्राच्या मर्यादेतच बियाणे मिळत होते. परंतु यावर्षी ही मर्यादा २.५ एकर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याशिवाय राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी सुवर्णा सोया, फुले दुर्वा, पी.डी.के.व्ही अंबा, एन.आर.सी-१३०, फुले किमया, MACS-१४६०, MACS-७२५ या वाणाचे बियाणे १००% अनुदानावर उपलब्ध होत आहेत. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल.

वरील सर्व बियाण्याची माहिती देणे तसेच विक्री करण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याच्या हेतूने महाबीजने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अधिकृत विक्रेत्यांच्या सभा घेतल्या व विक्रेत्यांना बियाणे विक्री साठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे बाबत माहिती देण्यासाठी गावस्तरावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. यात नवनवीन वाणांची व जैविक खते व बुरशीनाशकची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.