Kharif sowing : मॉन्सून आला; पण खरीप पेरणी करायची का थांबायचं?

Kharif sowing : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा तब्बल ११ दिवस आधी दमदार आगमन केले आहे. २४ मे रोजी केरळ व तामिळनाडू पार करत तो कर्नाटकात पोहोचला आणि २५ मे रोजी गोवा व्यापत वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळमार्गे दक्षिण कोकणात प्रवेश केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असली, तरी तात्काळ पेरणी योग्य ठरेल का? — हा खरा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर म्हणजे ३१ मेपर्यंत कोकणातील सातही जिल्ह्यांत — विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्गात — जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी पावसाने चिंब होणार आहे.

मात्र खान्देश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत २६ व २७ मे रोजी पावसाचा जोर दिसणार असून, त्यानंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होणार आहे. पाऊस कमी अधिक होत राहील, हे मान्य करतानाच याचा खरीप पेरणीवर काय परिणाम होईल हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

पेरणीस वेळ आहे का?
निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्यानुसार, यंदा मे महिन्यात अनेक भागांत अवकाळी पावसामुळे जमिनीत ओल तयार झाली आहे. यामुळे जमीन सध्या वाफसायुक्त नाही. अशा परिस्थितीत जर मे अखेरीस पेरणी केली गेली, तर ती ‘अतिआगाप’ पेरणी ठरू शकते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

त्यांच्या मते, अवकाळी पावसामुळे आलेली जमीनओल आणि खरी मान्सून पावसाने तयार होणारी थंडावलेली ओल यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे, जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यांमध्ये चांगल्या पावसामुळे जमिनीत वाफसा तयार झाल्यावरच पेरणी करणे अधिक योग्य ठरेल. या शिवाय कृषी विभागातील तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांना पुरेसा वाफसा असल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा सल्ला
माणिकराव खुळे पुढे सांगतात की, “शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय आपल्या विवेकाने घ्यावा, मात्र हवामानातील अनिश्चितता पाहता सध्या थोडी वाट पाहणेच अधिक शहाणपणाचे ठरेल.” मान्सूनचा पाऊस जसजसा स्थिर होईल, तसतसे खरीपासाठी योग्य वातावरण तयार होईल.

मॉन्सूनने महाराष्ट्रात जोरदार एंट्री घेतली असली, तरी खरीप पेरणीबाबत घाई करू नये, असा तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला आहे. विशेषतः जमिनीची वाफसा स्थिती, पावसाची सातत्यपूर्णता आणि स्थानिक हवामान यांचा विचार करूनच पेरणी करावी. हवामान खात्याचे दररोजचे अद्यतन आणि स्थानिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लक्षात घेणे हेच यशस्वी हंगामाचे सूत्र ठरणार आहे.