Magnet project : महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार..

Magnet project : आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

प्रमुख १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ६ वर्षासाठी (सन २०२० ते २०२६ पर्यंत) हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

यापूर्वी या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून विभागाचे सचिव काम पाहत होते. या निर्णयामुळे आता राज्याचे पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम पाहतील. तसेच मॅग्नेट प्रकल्प राबवणे व या प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीच्या रचनेतही बदलास मान्यता देण्यात आली.

त्यानुसार सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील तर, उपाध्यक्षपदी पणन मंत्री व मुख्य सचिव हे सदस्य असतील. या निर्णयानुसार मॅग्नेट संस्थेच्या रचनेमध्ये तसेच राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या रचनेमध्ये सुधारीत बदलासंदर्भात मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापन पुस्तिकेमध्ये अनुषंगीक बदल करण्यास मान्यता देण्यात आली.