
Mantra agriculture:तुती रेशीम उद्योग हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये चालू आहे. टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने चालू असून यातून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्तम जोडधंदा लाभला आहे.
नैसर्गिक रेशीम धाग्याला त्याच्या मुलायमप्रमाणे ‘वस्त्रोद्योगाची राणी’ असे संबोधण्यात येते. रेशीम कोष उत्पादन झाल्यानंतर त्यापासून रेशीम धागा निर्मिती करुन वस्त्र निर्मिती केली जाते. शासनामार्फत या योजनेचा विस्तार व विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.
शेतीसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्नात भर पडावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत व रेशीम संचालनालय, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती रेशीम अळीच्या कोषापासून होते. निसर्गात 4 प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. मोठ्या प्रमाणावर तुती रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी तुतीच्या झाडांची सलग लागवड करावी लागते. तुतीच्या झाडांची पाने खाऊ घालून रेशीम कोष उत्पादन करणे याला ‘रेशीम शेती’ म्हणतात. हा एक कुटीर उद्योग असून शेतीला उत्तम पूरक जोडधंदा आहे. रेशीम अळ्यांचे संगोपन हे संगोपन गृहामध्ये करावयाचे असते. याकरिता संगोपन साहित्य व आदर्श पक्के संगोपन गृह बांधणे आवश्यक आहे.
रेशीम कोष उत्पादन व्यवसाय हा महत्त्वपूर्ण आहे कारण शेतीला उत्कृष्ट जोडधंदा आहे. अल्प कालावधीचे पीक असल्यामुळे पाल्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास दुसऱ्या वर्षापासून वार्षिक किमान पाच पिके घेता येतात. तुती लागवड केल्यानंतर 10ते 15 वर्षापर्यंत पुन्हा लागवड करण्याची गरज नाही. तुतीच्या फांद्या व अळ्यांच्या विष्ठेपासून उत्तम सेंद्रिय खत निर्मिती करता येते. घरातील व्यक्तीद्वारे सहज व सुशिक्षित बेरोजगार यांनी करण्यासारखा उद्योग आहे. इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. या व्यवसायात महिलांचा 50 ते 60 टक्के सहभाग आहे. शिवाय पर्यावरण पुरक व्यवसाय आहे.
करा रेशीम शेती, पिकवा मातीतून मोती…
रेशीम कोष खरेदी किमान आधारभूत किंमत व इतर राज्यात विकण्यास सुद्धा मुभा आहे. शिवाय तुतीचा शिल्लक पाला जनावराचे उत्तम खाद्य आहे. विद्यावेतनासह रेशीम शेती प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व सवलतीचे दरात अंडीपूंज पुरवठा देखील करण्यात येतो. रेशीम कोष उत्पादन करणेसाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर उत्तम पाण्याचा निचरा होणारी व बारमाही ओलीत असलेली जमीन असणे आवश्यक आहे. मात्र तुतीची लागवड इतर पिकांमध्ये करु नये. दुसऱ्या वर्षापासून 500 ते 600किलो कोषचे दिड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 40ते 50 हजार पर्यंत खर्च येतो. म्हणजेच 1 लाख ते 1.5 लाख रुपये निव्वळ नफा एक एकर पासून मिळवता येतो.