
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरात आली आहेत, परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाने खरिपातील पिकांवर विविध कीड व रोगांनी चांगलाच हल्ला केला आहे . त्यामुळे पाऊस उघडताच भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करायला सुरुवात केली आहे . आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची साथ फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळाली आहे . ड्रोन ने फवारणी करण्यासाठी उत्पादन खर्चही जास्त लागत नाही.
दरम्यान फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता नव्या तंत्राची जोड मिळाली आहे. आता ड्रोनव्दारे अगदी सोप्या पध्दतीने फवारणी केली जाते. त्यामुळे आता शेतकरी वर्गाचा कल या नव्या तंत्रज्ञानाकडे वाढत चालला आहे .
परंतु सततचा पाऊस, ढगाळ हवामानामुळे पाथरूड परिसरामध्ये अनेक शेतकरी ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करण्याकडे वळाले आहे . यावर्षी तालुक्यामध्ये सर्वत्र पिकांची वाढ जरी चांगली असली तरी त्यावर सध्या वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसत आहे.
यंदा पन्नास हजार हेक्टरपेक्षाही जास्तीच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा भूम तालुक्यात झाला आहे , यातील ९० टक्के क्षेत्रात सोयाबीनचे पीक आहे. यंदा चांगल्या पावसामुळे पिकांची वाढही चांगली झाली आहे .
तालुक्यातील अनेक शेतकरी खरीप पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी करताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे फवारणीमुळे वेळेचीही मोठी बचत होत आहे . पिकाची वाढ जोमदार झाल्यामुळे पिकांमध्ये जाता येत नाही. शिवाय, फवारणीसाठी मजूर पण मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर फवारणीसाठी अडचणी येत आहेत.
एका दिवसात १५ ते २० एकरांत होते फवारणी..
जवळपास १५ ते २० एकर क्षेत्राची फवारणी ड्रोनद्वारे दिवसभरात होते. यामुळे वेळेची बचत होत आहे. शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीसाठी औषधाव्यतिरिक्त्त प्रति एकर ७०० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे खर्च हि जास्त येत नसल्याचे शेतकरी सांगतात.
सध्या ड्रोनची वेटिंग सुरू..
अनेक शेतकऱ्यांकडून फवारणीसाठी ड्रोनची मागणी होत आहे. जवळपास पाचशे एकर क्षेत्राची फवारणी आतापर्यंत करण्यात आली आहे. अजूनही चार-पाचशे एकर क्षेत्रात फवारणी करायची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या वेटिंगवर थांबावे लागत आहे.
– विनय गलांडे, ड्रोन ऑपरेटर
फवारणी करणे सहज शक्य..
गेल्या पंधरा दिवसांपासून पिकांवर अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे , आणि पिकांची वाढ जास्त झाल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये फवारणीसाठी मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ड्रोनमुळे सहज फवारणी करता येते.- माधव महानवर, शेतकरी, सावरगाव