
farmers sow : मागील आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान होत असतानाच मॉन्सून वेळेआधीच कोकणात दाखल होऊन त्याने थेट पुण्यापर्यंत मजल मारली. मात्र आता मॉन्सूनने विश्रांती घेतली असून त्याची चाल काहीशी थंडावली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांसाठी घाई करू नये असा इशारा हवामान खात्यासह कृषी विभागाने दिला आहे.
बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.