
kanda market rate : एप्रिलमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कांद्याची आवक जास्त होती. त्यानंतर मे महिन्यात कांदा आवक घटली, मात्र मे महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने ओला झालेला कांदा शेतकऱ्यांना नाईलाजाने विक्रीसाठी आणावा लागला. परिणामी शेवट्च्या दोन आठवड्यात आवक वाढून बाजारभाव काही प्रमाणात घटले, मात्र एप्रिलच्या तुलनेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मे महिन्यात कांदा बाजारभावात काहीशी वाढ दिसून आली.
यंदा एप्रिल महिन्यात संपूर्ण देशभरात ३१ लाख ५४ हजार मे. टन कांदा आवक बाजारांत झाली. तर मे महिन्यात १९ लाख ५८ हजार मे. टन आवक झाली. म्हणजेच सुमारे ३५ ते ४० टक्के आवक मे महिन्यात कमी झाली. देशभराचा विचार करता महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात आवक सर्वाधिक होती. त्यातही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आणि मध्यप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर एप्रिल महिन्यात सरासरी ९०० रुपये कांदा बाजारभाव होते. ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल असे पोहोचले आहे. त्यातही मे महिन्याच्या शेवटी राज्यात उन्हाळी कांदा बाजारभाव सरासरी ११७३ रुपये इतके होते. मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात सुमारे १७ टक्के वाढ झाली. लाल कांद्या्च्या दरातही सुमारे १४ टक्क्यांनी वाढ होऊन ते ११३६ पर्यंत पोहोचले.
दरम्यान या सप्ताहात अवकाळी पावसाने बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात सुमारे ३ लाखांहून अधिक कांदा आवक बाजारात झाली. परिणामी बाजारात आठवड्याच्या सुरूवातीला काहीसे चढे असलेले बाजारभाव या तीन दिवसात १०० ते २०० रुपयांनी घसरले, मात्र शनिवार आणि रविवारी त्यात पुन्हा वाढ झाली. अवकाळी पावसाने यंदा अनेक शेतकऱ्यांचा शेतातील आणि काढणी केलेला कांदा खराब झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम आता येणाऱ्या काळात कांदा बाजारभावावर होणार असून जूनमध्येही कांदा बाजारभाव वाढीचे संकेत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.