
Monsoon update : पावसाळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मान्सूनने आपली वाटचाल सुरू केली असून येत्या २४ तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने, महाराष्ट्रातही तो वेळेत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या मान्सून कुठे पोहोचला आहे?
मान्सूनची उत्तर मर्यादा सध्या ५ अंश उत्तर/६० अंश पूर्व ते २३ अंश उत्तर/९५ अंश पूर्व या भागांत आहे. याचा अर्थ, मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप, मालदीव, कोमोरीन, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि ईशान्य भारतातील काही भाग व्यापले आहेत. पुढील काही दिवसांत तो दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरात तसेच ईशान्य भारतात अधिक विस्तारेल.
महाराष्ट्रात मान्सून कधी येईल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सूनची वाटचाल सध्या सामान्य असून लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने तो सरकणार आहे. कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रत्नागिरी ते दापोली या भागात आज २४ मे रोजी पावसाची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल होण्यास पोषक परिस्थिती आहे.
पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी कसे असतील?*
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात २४ ते २५ मे दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातही २५ मे रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
मराठवाडा आणि विदर्भातही २४ ते २७ मे दरम्यान पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होऊ शकते. वाऱ्याचा वेग काही भागांत ५० ते ७० किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. यामुळे पिकांचे, कच्च्या रस्त्यांचे आणि कमजोर बांधकामाचे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तापमान आणि उष्णतेची स्थिती
उत्तर भारतातील काही भागांमध्ये तापमानात २ ते ४ अंश सेल्सियस वाढ होणार असून, पश्चिम राजस्थानात उष्णतेची लाट कायम राहील. महाराष्ट्रात मात्र तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे. आगामी दिवसांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी. उभ्या पिकांना आधार द्यावा, काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वीज गडगडाट आणि वादळी वाऱ्यांच्या काळात उघड्यावर राहू नये. जनावरांसाठी सुरक्षित निवारा आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.