Dhananjay munde : बीड खून प्रकरणी अजितदादांनी धनंजय मुंडेंना पाठीशी का घातले?

Dhananjay munde: सध्या बीड खूनाचा विषय सगळीकडेच गाजत असताना या खूनाशी अप्रत्यक्षपणे ज्यांचे नाव जोडले जातेय, ते म्हणजे राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असलेला संशयित सूत्रधार वाल्मिक कराड हा मंत्री मुंडे यांचा जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक करत आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडूनही दबाव वाढत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी मंत्री मुंडे यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला असल्याचे समजत आहे. त्यानंतर अजित पवार यांनी मुंडे यांच्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते. कारण सध्या सुरेश धस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांचीही मुंडे यांच्यावर नाराजी असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी असल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून मौन बाळगलेले नेते अजित पवार अचानक ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुंडे राजीनामा देणार नाहीत असे सांगितल्याचे समजते. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आज त्यांच्यावर पुन्हा टिका होत आहे. मात्र जोपर्यंत मंत्री मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणे उचित नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद वाचले आहे.

दुसरीकडे मध्यंतरी महायुतीतच अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटात राजकारण सुरू असल्याच्या चर्चा होत्या. मंत्री मुंडे यांचा राजीनाम घेतला, तर शिंदे गट वरचढ होईल, तसेच भाजपाचे अंतर्गत राजकारणीही पवार यांच्याविरोधात वरचढ होतील अशी शक्यता असल्याने एकप्रकारे मुंडे यांचा राजीनामा न घेऊन पवार यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या काही नेत्यांना काटशह दिल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply