
Onion purchase : उन्हाळी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडने आता अधिकृत बाजारभाव जाहीर केले असून, त्यामुळे रखडलेली कांदा खरेदी प्रक्रिया आता या आठड्यात सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार ९ जून २०२५ रोजी प्रत्येक क्विंटलसाठी १४३५ रुपये इतका हमीखरेदी दर निश्चित करण्यात आला आहे. या दरानुसार शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना देण्यात आले आहेत.
यंदा देशभरातून नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन, अशा एकूण तीन लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याची खरेदी होणार आहे. मात्र, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारभाव न ठरल्याने ही खरेदी रखडली होती. आता दर जाहीर झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० जूनपासून नियमित खरेदी सुरू होणार असून त्याआधी सोमवारपासून खरेदीच्या ट्रायल सुरू झाल्याचे समजत आहे.
सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर १००० ते १४०० रुपये क्विंटल या दरम्यान आहेत. त्यामुळे नाफेडचा जाहीर दर हा काहीशा जास्त दराने निश्चित झाल्यामुळे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करताना त्यांना थोडासा फायदा होणार आहे. मात्र १६ जूननंतर दर पुन्हा जाहीर केले जाणार असून, ते राज्यातील कांद्याच्या सरासरी बाजारभावानुसार निश्चित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर माल विकण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
या खरेदी प्रक्रियेसाठी नाफेडने पुरवठा वैध पोर्टल (Supply Valid) वरून नोंदणी केलेल्या खरेदीदारांना खरेदी सुरू करण्यास सांगितले असून, खरेदीचे दैनिक अहवाल संबंधित संस्थेळा दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजेपर्यंत नाफेडला सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या खरेदीची कार्यपद्धती, साठवणूक आणि गुणवत्ता निकषांसंदर्भातील सर्व माहिती १३ जूनच्या पत्रात स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित खरेदी संस्था व एजन्सींनी त्या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यात म्हटले आहे.
ही खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू झाल्यास शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून काहीसा आधार मिळू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी अधिकृत खरेदी केंद्रांची माहिती घेऊन आपला माल योग्य दरात विकण्याचा विचार करावा.