नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. जालना जिल्ह्यातील दहा वीस नाही तर तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी या पहिल्या टप्प्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेतला आहे व शेतीचे चित्र बदलवले आहे.
यासाठी तब्बल ७८६ कोटींचा निधीही शासनाने खर्च केला आहे. शेतकऱ्यांची याद्वारे आर्थिक उन्नती होत आहे , लवकरच पोखराचा दुसरा टप्पाही सुरू केला जाणार आहे. शासनाने २०१८ साली पोखरांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतीपयोगी साधने आणि साहित्य योजनांचा लाभ दिला आहे .
योजनेचा पहिला टप्पा जून महिन्यामध्ये पूर्ण झाला असून, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये शेडनेट हाउस, तुषार सिंचन, फळबाग लागवड, शेततळे, मत्स्यपालन, ठिंबक सिंचन, हरितगृह, शेडनेट हाउसमधील लागवड साहित्य,नवीन विहीर, पंप संच, पाइप, पॉली टनेल,पॉली हाऊस, गांडूळ खतनिर्मिती, बंदिस्त शेळीपालन,विहीर पुनर्भरण, बीजोत्पादन, मधुमक्षिकापालन, रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन, रेशीम उद्योग, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अस्तरीकरण व इतर योजनांचा लाभ घेतला आहे.शासनाने या योजनेसाठी ७६८ कोटी १९ लाख रुपये इतके अनुदान वितरित केले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे तिचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून योजनेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे अशी विचारणा करण्यात येत आहे . योजनेचे बजेट मिळताच दुसरा टप्पा सुरू होणार आहे असे कृषी विभागाकडून म्हटले जात आहे. या दुसऱ्या टप्प्यातही जिलह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी कुठल्या योजनेसाठी घेतले अनुदान..
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी योजना
शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात पोखरांतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ३६३ गावांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत विविध कामे शेतीत झाली आहेत तसेच , शेतकऱ्यांना अधिक सक्षम होण्यास त्याची मदत मिळत आहे .
– जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.