जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोचे भाव तेजीत असून टोमॅटोच्या एका कॅरेटला अडीच हजार ते तीन हजार इतका उच्चंकी भाव मिळाला आहे. टोमॅटोचा असाच भाव पुढील एक महिनाभर राहील असा विश्वास टोमॅटो व्यापारी सारंग घोलप व योगेश घोलप यांनी व्यक्त केला आहे.
राज्यभरामध्ये नारायणगाव वगळता टोमॅटोचे उत्पादन नाही. नारायणगाव उपबाजारात दरवर्षी जून – जुलै महिन्यात टोमॅटोची सरासरी 40 ते 50 हजार कॅरेट आवक असते . परंतु सध्या फक्त आठ ते दहा कॅरेट इतकीच आवक होत आहे. तसेच बंगळूर बाजारात टोमॅटोला 25 किलो साठी चार हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. मागील तीन ते चार महिन्यापूर्वी टोमॅटोला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केले होते. काही शेतकऱ्यांनी एप्रिल- मे महिन्यात टोमॅटो नारायणगाव उप बाजारात फेकून दिले होते. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे जिथे 400 कॅरेट निघायला हवे होते, तिथे शंभरच कॅरेट माल निघाला .
दोन वर्षांपूर्वी टोमॅटो पिकावर ”प्लास्टिक व्हायरस’ आल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते . त्यावेळी शेतकऱ्यांना टोमॅटो लागवडीसाठी दोन लाख रुपये खर्च करूनही उत्पादन खर्च मिळाला नव्हता. त्यामुळे मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी फक्त 20 टक्केच लागवड झाली.
शासनाच्या धोरणामुळे लागवडीकडे दुर्लक्ष
शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे दुर्लक्ष केले असून, टोमॅटोला तेजी आली . कोरोना नंतर आखाती देशात 40 ते 50 टोमॅटोचे कंटेनर एक्सपोर्ट होत होते. परंतु शासनाने मालावरती निर्यात खर्च वाढवल्यामुळे अगदी आखाती देशात टोमॅटो पाठवणे बंद झाले. याचाच फटका उत्पादकांना बसला त्यामुळे मागील तीन वर्षामध्ये ऐन सीझनमध्ये मालाची किंमत मातीमोल झाली.
10 ऐवजी आता 25 रुपये
तीन वर्षांपूर्वी टोमॅटोचा उत्पादन खर्च जो येत होता. त्यामध्ये आता अडीच पट वाढ झाली आहे. मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . डिझेलचे भाव वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. वाहतुकीसाठी गाडी भाडे एका कॅरेट ला दहा रुपये होते, ते आता 25 रुपये द्यावे लागत आहे.
राज्याकडून मागणी वाढली
आपल्याकडे आता फक्त पाच टक्केच टोमॅटोची आवक आहे. जून महिन्यात नारायणगाव, बंगळूर यासह दहा ते पंधरा बाजारात टोमॅटोची आवक असते .टोमॅटोचे उत्पादन हे महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. काही राज्यांमध्ये दमदार पाऊस पडल्यामुळे टोमॅटोचे उत्पादन होऊ शकले नाही . तसेच 15 पेक्षा अधिक राज्याकडून टोमॅटोची मागणी वाढली ,परंतु आवक घटल्याने भाव वाढले आहेत . नाशिक भागातील टोमॅटो बाजारात येण्यासाठी महिन्याचा कालावधी असल्यामुळे पुढील एक महिना टोमॅटोचे भाव तेजित राहतील. अशी माहिती नारायणगाव उप बाजारातील व्यापारी सारंग घोलप व योगेश घोलप यांनी दिली आहे.