Onion rate : नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारभावात लक्षणीय घसरण झाली असून, देशांतर्गत व परदेशी मागणीत घट आणि आखाती देशांकडून कमी होत असलेली खरेदी यांचा यावर परिणाम दिसून येतो. केवळ एका महिन्यात सुमारे ३५ लाख क्विंटल आवक नोंदवली गेली असून, सरासरी दरात सुमारे ७७० रुपयांची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. सध्याच्या दरांत उत्पादन खर्चही निघत नसल्याने नुकसानभरपाई म्हणून विक्री होणाऱ्या प्रत्येक क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी होत असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील एकूण ३५ लाख क्विंटल कांदा आवकेपैकी लासलगाव बाजार समिती व उपबाजार विंचूर आणि निफाड येथे मिळून १० लाख ५४ हजार ६०६ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी कांद्याला जास्तीत जास्त २६११ रुपये, किमान ७०० रुपये आणि सरासरी १८७० रुपये दर मिळाला होता, मात्र ३१ जानेवारी रोजी हेच दर घसरून जास्तीत जास्त १४६० रुपये, किमान ५०० रुपये आणि सरासरी ११०० रुपये इतके राहिले. त्यामुळे केवळ एका महिन्यात सरासरी दरामध्ये तब्बल ७७० रुपयांची घट नोंदवली गेली असून, याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
चार एकरांवर लाल कांद्याचे पीक घेऊन लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला केवळ २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून, सरकारने अनुदान देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे, जेणेकरून भविष्यात कांदा पीक घेणे शेतकऱ्यांना परवडू शकेल. दुसरीकडे, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमध्ये होत असलेल्या निर्यातीवर विविध कारणांमुळे परिणाम झाला आहे—बांगलादेशात हिंसाचार व स्थानिक कांद्याची आवक, श्रीलंकेत ५० रुपयांचे आयात शुल्क, तर नेपाळमध्ये घटलेली मागणी आणि आखाती देशांत पाकिस्तान व चीनचा स्वस्त कांदा उपलब्ध झाल्याने भारतीय कांद्याची परदेशी मागणी कमी झाली आहे. या सर्व घटकांचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होत असून दरात सातत्याने घसरण होत आहे.












