Rohit Pawar PC : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या अपघाती निधनावर आता त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कुणाकडून बदलवला गेला हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचं बंद केलं होतं अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्याचसोबत विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना खात्रीच्या व्यक्तीचे हेलिकॉप्टर वापर असा सल्ला दादांनी आपल्याला दिल्याची आठवण रोहित पवारांनी सांगितली.
अजित पवार याचे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातात निधन झालं. या घटनेच्या 13 दिवसानंतर आता रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यावर काही प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांनी यासंबंधी त्यांच्याकडे असलेले तथ्येही समोर आणले.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही? असे काही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
कंपनीला हेव्ही बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का? तसा अहवाल कुणी दिला? या प्रकरणी क्लिअरर इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअरवर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
Rohit Pawar Questions On Ajit Pawar Accident : रोहित पवारांनी विचारलेले 10 प्रश्न.
1.अजितदादा बारामतीला कारने जाणार होते. पण एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी दादा थांबले. त्याला उशीर झाला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक नेता त्यांना भेटण्यासाठी उशीरा आला. उशीर झाल्यामुळे दादांनी विमानाने जायचं ठरवलं. अजितदादांचा प्लॅन कुणी बदलवला का?
2. दादा ज्या विमानातून जाणार होते त्या विमानाचा पायलट आणि को पायलट, दोघेही ऐनवेळी का बदलवण्यात आले?
3. दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचं होतं का?
4. व्हीएसआर कंपनीच्या विमानात काय बिघाड झाला होता? ते खाली येताना एका बाजूला कलल्याचं दिसलं, त्यामागे कारण काय? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय?
5. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?
6. विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?
7. . विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे?
8. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही?
9. या आधी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का?
10. सुमीत कपूर या पायलटवर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती अशी माहिती आहे. मग अशा पायलटला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं?












