Today bajarbhav : कांदा निर्यात पुन्हा वेग घेणार; लवकरच भाव वाढणार, कधी ते जाणून घ्या..

kanda bajarbhav : कांद्यावरील निर्यातशुल्क मार्च महिन्यात संपूर्णपणे काढून टाकल्यानंतर काही दिवसांसाठी बाजारातील कांद्याचे भाव २ ते ३ रुपयांनी वधारून सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यानंतर पुन्हा कांद्याची आवक वाढू लागली तसे बाजारभाव कमी होत चालले. सध्या कांद्याचे बाजारभाव लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सरासरी ११५० रुपये प्रति क्विंटलवर आहेत.

सध्या काय आहे स्थिती?
मागील दोन आठवड्यापासून पुणे, सोलापूर, नगर बाजारातील कांदा बाजारभाव सरासरी १ हजाराच्या खाली किंवा आसपास असून लासलगाव बाजारातील भाव सरासरी ११००च्या आसपास स्थिर आहेत. एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून मागच्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत ही आवक सुमारे पन्नास टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रातूनच दरदरोज सरासरी दीड लाख क्विंटल आवक होत असून गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही आवक वाढली आहे.

किती वाढणार दर:
या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात कांद्याचे दर हे एक हजाराच्या आसपास राहतील की त्यापेक्षा खाली घसरतील अशी उत्पादकांना चिंता आहे. मात्र लवकरच त्यांना कांदा बाजारभाव वाढीची चांगली बातमी मिळणार आहे. निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यापासून भारतीय कांद्याची निर्यात पुन्हा वाढणार असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्‌यापासून कांद्याच्या दरात साधारणत: २ ते ३ रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतीय कांद्याची मागणी वाढणार:
जागतिक बाजारातील विविध देशांचा हंगाम असतो, त्यानुसार कांदा आवक होत असते. भारतासोबतच पाकिस्तानही जगाला कांदा पुरवतो. त्याचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही तो भारतीय कांदा निर्यातीवर परिणाम करतो. एप्रिल अखेर पाकिस्तानचा कांदा संपत आला असून भारतीय कांद्याची मागणी वाढणार आहे. याच दरम्यान जागतिक बाजारात चीनचा कांदा दाखल झाला आहे.

असे असूनही आशियाई देशांमध्ये चीनच्या कांद्याला मागणी कमी आहे. भारतीय कांदा चवीला तुलनेने तिखट असल्याने या कांद्याला मागणी नेहमीच असते. त्यामुळे चीनच्या तुलनेत भारतीय कांद्याला मागणी वाढू शकते आणि कांदा निर्यात वाढून त्याचा परिणाम बाजारावर होईल. त्यातून शेतकरी आणि कांदा व्यापारी-निर्यातदार या सर्वांनाच दिलासा मिळण्याची शक्यता कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारी खरेदीमुळेही भाव वाढणार
दरम्यान मे नाफेड आणि एनसीसीएफने यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी दीड लाख मे. टन कांदा खरेदी म्हणजेच एकूण ३ लाख मे. टन कांदा खरेदी करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहेत. येत्या आठवड्‌यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच मे महिन्याच्या सुरूवातीला प्रत्यक्ष खरेदीला सुरूवात होईल. त्यानंतर बाजारात किमान २ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते असा व्यापाऱ्यांचा होरा आहे. एकूण मे महिन्यात सरकारी खरेदी आणि निर्यातीची वाढ यामुळे कांदा बाजारभाव सर्व मिळून ४ ते ५ रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे.