Kanda bajarbhav: राज्यात यंदाच्या जुलै महिन्यात कांद्याचे घसरलेले दर पाहून अनेक कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये दर घसरण प्रकर्षाने जाणवत आहे.
मात्र मागील पाच वर्षांचा जुलै व जून महिन्यांतील दराचा इतिहास पाहता याला एक नैसर्गिक चक्र किंवा बाजारातील नियमित चढउतार असे म्हणता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांवर विश्वास न ठेवता कांदा विक्री करायची किंवा कांदा साठवायचा याचा निर्णय घ्यावा असे कांदा अभ्यासक पंकज जोशी विंचूरकर यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात मागील पाच वर्षांचा अभ्यास करता हा नैसर्गिक ट्रेंड असल्याचे विश्लेषणही अभ्यासकांनी केले आहे. सुरुवातीला दरवर्षी जुलै महिन्याचे बाजारभाव पाहिले तर २०२१ मध्ये सरासरी दर १४२५ रुपये क्विंटल होते. त्याचवेळी अहिल्यानगर येथे १४६८, नाशिकमध्ये १६५४, पुण्यात १४०७, सोलापुरात १०१७ आणि छत्रपती संभाजीनगर येथे १४९३ रुपये दर होता. या तुलनेत २०२२ मध्ये या सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठी घट दिसून आली होती. जुलै २०२२ मध्ये सरासरी दर १०५० रुपये क्विंटलवर आले. छत्रपती संभाजीनगर येथे तो ९९३, नाशिकमध्ये ११७६ आणि सोलापुरात १०४२ रुपये इतका राहिला.
त्यानंतर २०२३ मध्ये अचानक दरात वाढ झाली. नाशिकमध्ये दर १२३६ रुपयांवर पोहचला, तर पुण्यात १४०१ आणि छत्रपती संभाजीनगर येथे १०५७ रुपये झाला. त्या वर्षी सरासरी दर १२३८ रुपये राहिला. मात्र २०२४ मध्ये कांद्याचे दर सर्वत्र दुपटीने वाढले. नाशिकमध्ये २८००, पुणे २३९३, छत्रपती संभाजीनगर २४२१ आणि सोलापूर २५४६ रुपये इतके दर मिळाले. सरासरी दर तब्बल २५२७ रुपये क्विंटलवर पोहोचले.
पण यंदा म्हणजे २०२५ मध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी दर १२६२ रुपये इतका राहिला आहे. नाशिकमध्ये १३७२, पुणे १७११, छत्रपती संभाजीनगर ११०२ आणि सोलापुरात १११३ रुपये दर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत ही घट ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून येणार नाही, अशी चिंता वाटू लागली आहे.
मात्र या दरांतील चढउतार पाहता लक्षात येते की जुलै महिन्यात दरांचा उतार-चढाव सातत्याने दिसतो. एक वर्ष दर वाढतात, तर दुसऱ्या वर्षी घसरण होते. उदाहरणार्थ, २०२१ ते २०२२ या दरम्यान दर मोठ्या प्रमाणात कमी झाले, पण २०२३ आणि २०२४ मध्ये पुन्हा वाढ झाली. त्यामुळे २०२५ मध्ये आलेली घट ही नैसर्गिक बाजार चक्राचा भाग असल्याचे मानता येईल.
दुसरीकडे, देशातील एकूण कांदा उत्पादनही यंदा घटले आहे. २०२१-२२ मध्ये उत्पादन ३१६.८७ लाख टन होते, जे २०२२-२३ मध्ये ३०२.०८ लाख टन झाले. यंदा म्हणजे २०२३-२४ मध्ये उत्पादन २४२.१२ लाख टनांवर आले. म्हणजेच मागणी स्थिर असतानाही पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे भविष्यातील काही आठवड्यांत कांद्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अजून थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. जुलै महिन्यातील दर कमी असले तरी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून दर वाढण्याची शक्यता आहे. साठवणूक केलेल्या कांद्यावर थोडा वेळ थांबणे, हे यंदा फायदेशीर ठरू शकते. बाजार चक्रानुसार, हा दरघटाचा कालावधी दीर्घकाळ टिकणारा नसून मागणी वाढल्यावर पुन्हा बाजार सावरतो, असा अनुभव मागील वर्षांतील ट्रेंडवरून दिसून येतो.
(टिप : वरील माहितीचा उपयोग केवळ संदर्भासाठी करावा. कांदा विक्रीचा, साठवण करण्याचा निर्णय शेतकरी बांधवांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यासाठी कृषी २४ हे पोर्टल किंवा कृषी अभ्यासक कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा सल्ला देत नाही.)












