
kanda bajar bhav: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट २०२५ महिना किंचित आशादायक ठरू शकतो. कारण देशभरात झालेली कांद्याच्या आवकात लक्षणीय घट आणि मागील वर्षाच्या तुलनेत मागणीत स्थिरतेची चिन्हे हे घटक दरवाढीस हातभार लावण्याची शक्यता निर्माण करतात.
सर्वप्रथम देशपातळीवरील आकडेवारीकडे पाहता, १३ ते १९ जुलै २०२५ या आठवड्यात देशातील एकूण कांदा आवक ३.५१ लाख टन होती, जी २० ते २६ जुलै दरम्यान २.५६ लाख टनांवर आली. म्हणजेच केवळ आठवड्याभरातच सुमारे २५ टक्क्यांनी आवक घटली. महाराष्ट्रासारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्याचीच १.७४ लाख टनाहून कमी होऊन १.२२ लाख टन एवढी झाली. ही घट भाववाढीचा संकेत मानली जात आहे.
मागील वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२४ मध्ये महाराष्ट्रात अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल २८०० ते ३३०० रुपयांदरम्यान पोहोचले होते. विशेषतः नाशिक (३३०१ रु.), पुणे (३००० रु.), सोलापूर (३०५१ रु.), अहमदनगर (२८३३ रु.) आणि छत्रपती संभाजीनगर (२८३३ रु.) या जिल्ह्यांमध्ये दर उच्चतम होते. त्या तुलनेत जुलै २०२५ मध्ये हे दर घसरून अनुक्रमे १४०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान होते, म्हणजेच ४५ ते ५५ टक्क्यांची घसरण दिसून आली.
*ऑगस्टच्या शेवटी संभाव्य दर*
याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२५ मध्ये संभाव्य बाजारभावांचा अंदाज घेतल्यास, मागणी स्थिर राहिल्यास आणि नव्या पिकांची जोरदार आवक न झाल्यास दर पुन्हा एका प्रमाणात वाढू शकतात, असे कांदा अभ्यासक आणि विश्लेषकांनी सांगितले आहे. त्यामुळे खालील जिल्ह्यांतील ऑगस्ट २५ साठी अंदाजित सरासरी दर पुढीलप्रमाणे असू शकतात. हवामान, मागणी पुरवठा, निर्यातीचे प्रमाण आणि आवक यानुसार खालील दरात सुमारे २०० ते ३०० रुपयांची घट किंवा १०० रुपयांची वाढही होऊ शकते हे शेतकऱ्यांनी गृहित धरावे.
*कुठल्या जिल्हयात कसे राहतील संभाव्य दर*:
* *नाशिक*: मागील ऑगस्टमध्ये ३३०१ रुपये व जुलै २०२५ मध्ये १३४९ रुपये होते. यंदा दर सुमारे १८०० ते २२०८ रुपये* दरम्यान राहण्याची शक्यता.
* पुणे*: मागील ऑगस्ट ३००० रुपये, जुलैमध्ये १५७४ रुपये. यंदा २००० ते २४०० रुपये होण्याची शक्यता.
* *सोलापूर*: मागील ऑगस्ट ३०५१ रुपये, जुलैमध्ये १०९६ रुपये. संभाव्य दर १७०० ते २१०० रुपये दरम्यान असू शकतात.
* *अहमदनगर*: मागील ऑगस्ट २८३३ रुपये, जुलैमध्ये ११६५ रुपये. संभाव्य दर १६०० ते २००० रुपये असू शकतो.
* *छत्रपती संभाजीनगर* : मागील ऑगस्ट २८३३ रुपये, जुलैमध्ये १०९२ रुपये. दर १५०० ते १९०० रुपये दरम्यान राहू शकतात.
अर्थातच, हे अंदाज मागील ट्रेंड व पुरवठा-आवक यांच्या तुलनेवर आधारित आहेत. बाजारात जर नव्या कांद्याची आवक वाढली किंवा निर्यात रेंगाळली, तर ही किंमत मर्यादित वाढीसह थांबू शकते. विशेषतः गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील विक्रमी दरांमुळे यंदा किरकोळ व्यापारी व शेतकरी साठवणुकीसाठी पुरेसे जागरूक असल्याने बाजारात किंचित अधिक आवक येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी वरील माहितीचा उपयोग केवळ संदर्भासाठी करावा. कांदा साठवायचा किंवा विकायचा याचा निर्णय त्यांनी स्वत:च्या विवेकानुसार घ्यायचा असून कृषी २४ यासाठी कोणतीही शिफारस करत नाही.
एकंदरीत, ऑगस्ट २०२५ मध्ये शेतकऱ्यांना जुलैपेक्षा किंचित अधिक बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ ५० टक्क्यांपेक्षा कमी असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दर आणि आवक यावर नियमित लक्ष ठेवून, गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विक्रीचा विचार करणे योग्य ठरेल.
(टिप: वरील माहिती कॉपीराईटयुक्त असून त्याची कुठल्याही प्रकारे कॉपी केल्यास कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी वरील माहितीचा केवळ संदर्भ म्हणून उपयोग करावा. विक्री किंवा साठवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा. नुकसान झाल्यास कृषी २४ जबाबदार नाही.)10:23 AM