kanda bajarbhav : कांदा स्थिरावला; उन्हाळीसह चिंचवड कांद्याला काय भाव मिळतोय?

kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्यात कांद्याची आवक वाढताना दिसत होती. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीला कांदा आवक मर्यादित होताना दिसत आहे. अवकाळी पावसाने खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आणला होता. त्याचा परिणाम बाजारभाव कमी होण्यात झाले. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण आहे.

सोमवारपासून कांद्याची आवक मर्यादित होत असून सोमवारी मागच्या आठवड्याच्या तुलनेत निम्माच म्हणजे २ लाख क्विंटल कांदा राज्यातील बाजारासमित्यांमध्ये दाखल झाला. त्यापैकी लाल कांद्याची आवक आता संपूर्ण राज्यात जवळपास संपत चालली असून केवळ १६ हजार क्विंटल लाल कांदा राज्यात काल दाखल झाला.

मागच्या आठवड्याचे बाजारभाव या आठवड्यात टिकून आहेत. त्यात केवळ ५० ते १०० रुपयांची घट होताना दिसत आहे. आज दिनांक १३ मे रोजी पिंपळगाव बसवंतच्या उपबाजार असलेल्या सायखेडा बाजारात सकाळच्या सत्रात सुमारे ३३०० क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. कमीत कमी दर ५०० रुपये जास्तीत जास्त दर ११०० आणि सरासरी दर ९३० रुपये प्रति क्विंटल मिळाला. कालच्या तुलनेत या ठिकाणी सरासरी दरात ३० रुपयांची घट झाल्याचे दिसून आले. तर पुणे बाजारात सरासरी १ हजार ५० रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान काल दिनांक १२ मे रोजी राज्यात लासलगाव बाजारसमितीतीत उन्हाळी कांद्याला ११५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मागचे जवळपास दोन आठवडे लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या मुख्य बाजारात कांद्याची आवक चांगली आहे आणि दरही साधारणत: ११०० च्या आसपास टिकून आहेत. पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळी कांद्याला ११५० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.

पुणे बाजारात काल लोकल कांद्याला सरासरी १ हजार तर सांगली बाजारात लोकल कांदयाला सरासरी ९५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोलापूरच्या मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याला सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाला. जुन्नर नारायणगाव बाजारात चिंचवड वाणाच्या कांद्याला सरासरी १ हजार रुपये बाजारभाव मिळाला.