
kanda bajarbhav today: लासलगावमध्ये सोमवारी सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आज सकाळच्या सत्रात बाजारात पहिल्या १ तासात ७०० नग (गाड्या) लाल कांदा आवक झाली. जास्तीत जास्त बाजारभाव २६०० रुपयांपर्यंत पोहोचला असून कमीत कमी १ हजार तर सरासरी २३०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान प्रति क्विंटल आहेत. शनिवारच्या तुलनेत १ ते दीड रुपये प्रति किलो बाजारात वाढ झाली आहे.
या संदर्भात कृषी २४ ने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवून आभार मानले आहेत. सोमवारी बाजार वाढले असा अंदाज दोन दिवसांपूर्वी विविध घटकांच्या हवाल्याने कृषी२४ने व्यक्त केला होता. तो आज सोमवती अमावस्येला खरा ठरला आहे. मागील काही सोमवारपासून कांद्याचे बाजारभाव वाढताना दिसत असून आठ दिवसात कांद्याच्या सरासरी बाजारभावात ५ ते ६ रुपयांची, तर जास्तीत जास्त बाजारभावात सुमारे ८ रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे.
लासलगाव बाजाराचे लिलाव प्रमुखांनी कृषी२४ ला दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लासलगाव लिलाव यार्डात शेतकऱ्यांच्या ७०० गाड्या आल्या आणि जास्तीत जास्त लिलाव रक्कम ही २७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली. दुपारीही हे बाजाराभाव टिकून राहण्याची शक्यता आहे.
पिंपरीमध्येही भाव तीन हजारपार
सोमवारी सकाळी पुण्याच्या पिंपरी बाजारात लोकल कांद्याची तुलनेने कमी आवक झाली असली, तरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव कमीत कमी २५००, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २७५० असे पोहोचले आहेत.
पुण्यात बाजारभाव टिकून रविवारी आवक घटली…
दरम्यान या रविवारी राज्यातील एकूणच कांदा आवक घटली असल्याचे दिसून आले. पुणे बाजारात रविवारीही लिलाव होतात. या ठिकाणी म्हणजेच गुलटेकडी बाजारात १७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. सरासरी बाजारभाव २४०० तर जास्तीत जास्त ३३०० असा होता. शनिवारच्या तुलनेत पुणे बाजारातील कांद्याचे भाव टिकून राहिल्याने दिसले. तसेच आवक वाढूनही भाव पडले नाहीत हे वैशिष्ट्य होते.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजारात अगदी कमी कांदा आवक झाल्याने रविवारी लाला कांदय्ाने येथेही भाव खाल्ला. सरासरी २७४० रुपये बाजारभाव होते. अकलूज बाजारातही सरासरी २५०० रुपये कांदा बाजारभाव दिसून आले.
येवला आणि लासलगाव बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातील शेजारी असलेल्या कोपरगाव बाजारात माल नेणे पसंत केले. त्यांचीही निराशा झाली नाही. त्यांना लाल कांदय्ाला सरासरी २३३० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेचार हजार क्विंटल लाला कांदा आवक झाली. शिरूर बाजारात सरासरी २५०० रुपये, तर राहुरी बाजारात १८५० रुपये सरासरी बाजारभाव होते.