आता ४ % व्याजदरानेच मिळणार पशु किसान क्रेडिट कार्डवर कर्ज…

pasupalan

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेतून पशुपालन आणि मच्छीमारी करणाऱ्या लोकांना विविध गरजांना बॅंकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे.

देशातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं. देशातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड स्किमची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.    

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तेही फक्त ४ टक्के व्याजदराने मिळणार आहे.

योजना काय आहे?

ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. पशुपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देऊन त्याला उभारी देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी पशुपालकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दीड लाख रक्कमेपर्यंत तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे दीड लाख मर्यादेपर्यंतचं कर्ज विना तारण मिळेल.

कर्ज किती मिळणार? 

पशु किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत म्हशीसाठी ६० हजार, गायीसाठी ४० हजार, बकरी आणि मेंढ्यांसाठी ४ हजार आणि एक कोंबडीमागे ७२० रुपये कर्ज दिले जाते. बॅंक किंवा वित्तसंस्था पशु किसान क्रेडिट कार्डधारकांना फक्त ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे. पशुपालकांना ६ समान हप्त्यांमध्ये कर्जाचं वितरण केलं जातं. त्यांना त्याची ५ वर्ष कालावधीत परतफेड करावी लागेल. साधारणत: बॅंका शेतकऱ्यांना ७ टक्क्यांनी व्याज दराने कर्ज देत असते. मात्र, पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना ३ टक्क्यांची सूट दिली जाते.

अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत केवाईसी म्हणून आधार कार्ड,  पॅन कार्ड, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, जमिनीची कागदपत्रे व पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. तसेच अर्जदार या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी अर्जदाराला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर कागद तपासणी पूर्ण झाल्यास पात्र पशुपालकांना १५ दिवसांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

source:- agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *