
Maharashtra Pre-monsoon rains : सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याचे शेवटचे टप्पे सुरू असून, हवामानात हळूहळू बदल जाणवू लागले आहेत. अंदमान आणि आग्नेय बंगालच्या समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा पहिला टप्पा दाखल झाला असून, तेथे चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २३ ते ३१ मे या कालावधीत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आजपासून पुढील १५ ते २० दिवस म्हणजेच साधारणतः ३१ मेपर्यंत, संपूर्ण राज्यात काही प्रमाणात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. या काळात प्रत्यक्ष मान्सून येणार नसला, तरी मान्सूनपूर्व पावसाळी वातावरणामुळे वीजांचा कडकडाट, ढगाळ हवामान, हलक्या ते मध्यम सरी, आणि वाऱ्यांचा वेग जाणवण्याची शक्यता आहे.
हे अवकाळी वातावरण विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येईल. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पेरणीपूर्व मशागत करण्यास अनुकूल परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या हवामान बदलावर लक्ष ठेवून आपल्या शेतमालाची व मशागतीची योग्य तयारी करावी, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
हवामानातील या बदलामुळे तापमानातही काहीसा फरक जाणवेल. सरासरीपेक्षा थोडेसे कमी तापमान महाराष्ट्रात दिसून येईल. विशेषतः रात्रीचा उकाडा कमी जाणवेल. दिवसाही उष्णता सौम्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, दरम्यानच्या काही दिवसांत काहीशी वाढ किंवा घट होऊ शकते.
हवामान विभागाच्या पुणे केंद्रातील माजी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, सध्याचे वातावरण हे पूर्णतः मान्सूनचे नाही, मात्र त्याची चाहूल देणारे आहे. पुढील काही दिवस तरी हेच वातावरण टिकून राहण्याची शक्यता असल्याचे समजते.
दरम्यान, भारत हवामान विभागाने ११ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या हंगामी मान्सून अंदाजानुसार, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामासाठी नियोजन सुरू करावे, अशी सूचना हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.