Kharif Crop : खरीपाची अशी करा तयारी; मात्र पेरण्यांची घाई नको…

Kharif Crop

Kharif Crop : सध्या मराठवाड्यात जूनपूर्वीच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असली, तरी हा पाऊस हा केवळ पूर्वमोसमी असून खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी पुरेसा नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने आणि ग्रामीण कृषि हवामान सेवा योजनेंतर्गत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 30 मे ते 5 जून 2025 या कालावधीत मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमानही सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

इसरोच्या सॅक, अहमदाबाद विभागाच्या उपग्रह निरीक्षणानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग घटलेला आहे, म्हणजेच जमिनीतील आर्द्रता साठून राहण्याची शक्यता वाढली आहे. याचा फायदा पेरणीपूर्व मशागतीस होऊ शकतो, मात्र पेरणीस अद्याप वेळ लागेल.

पूर्वमोसमी पावसामुळे पेरणीस घाई नको:
सध्याचा पाऊस पूर्वमोसमी असून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू होण्यास काही आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून पेरणीची घाई करू नये. काही भागांत हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे. आवश्यक असल्यास कापणी थोडी पुढे ढकलावी.

मशागत करा, पेरणीस सज्ज राहा:
विद्यापीठाच्या शिफारशींनुसार सध्या शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून योग्य तयारी करून ठेवावी. नांगरणीनंतर मोगडणी करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायतीसाठी 10 टन कुजलेले शेणखत समप्रमाणात पसरावे.

कापूस लागवड:
कापूस लागवडीसाठी जमिन, हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणांची निवड करावी. तुर लागवडीसाठी शेणखतासह दोन ते तीन पाळ्या देऊन बीडीएन-2013-41 (गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीडीएन-716 अशा शिफारश केलेल्या वाणांचा वापर करावा. पावसाळ्यात तुरावरील करपा रोग टाळण्यासाठी शेताच्या चारही बाजूने तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावेत.

मुग, उडीद, भुईमूग, मका पिकासाठी तयारी:
मुग आणि उडीद लागवडीसाठीही पाळ्यांनंतर शेणखत मिसळून जमीन तयार करावी. मुगसाठी कोपरगाव, बीपीएमआर-145, फुले मुग 2 व उडीदसाठी बीडीयु-1, टीएयू-1 हे वाण उपयुक्त आहेत.

भुईमूग लागवड:
भुईमूग लागवडीसाठी शेणखत मिसळून वखरणी करावी. एसबी-11, जेएल-24, टीएजी-24, टीजी-26 यासारख्या वाणांचा विचार करावा. मका लागवडीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, प्रभात, करवीर, यूवराज अशा वाणांची निवड करावी.

योग्य नियोजन आवश्यक:
पूर्वमोसमी पावसामुळे वातावरण दमट झाले आहे, याचा फायदा शेती तयारीस होतो. मात्र खरी पेरणी करण्यासाठी अजून काही दिवस थांबणे शहाणपणाचे ठरेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात अधिक पावसाची शक्यता असल्याने खरीप हंगाम भरघोस होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे पेरणीस योग्य वेळ येईपर्यंत योग्य नियोजन करून, मशागत पूर्ण करून ठेवा. स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवा आणि सल्ल्यानुसार पावले उचला.