
Market trend : सध्या टोमॅटो, कांदा या पिकांचे सरासरी दर वाढलेले आहेत. तसेच हळद आणि सोयाबीनही वधारले असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात (18 मे ते 25 मे 2025) राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि हळद या पिकांच्या दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. हवामानातील बदल, साठवणुकीवरील मर्यादा आणि मागणी वाढ यामुळे काही मालाच्या दरात जोरदार वाढ झाली.
कांद्याच्या दरात स्थिरता, पण मागणीमुळे किंचित वाढ
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्यात कांद्याचा दर सरासरी 1164 रुपये प्रति क्विंटल इतका होता, जो याआधीच्या आठवड्यात 942 रुपये होता. याचा अर्थ दरात सुमारे 22 टक्क्यांची वाढ झाली. मागणी वाढ, नवा कांदा कमी प्रमाणात येणे, आणि उन्हाळ्यात होणारे साठवणुकीचे नुकसान यामुळे ही किंमतवाढ झाली आहे. देशभरातील आवकेत मात्र ५ टक्के घट झाली.
टोमॅटोची मागणी वाढल्याने दरात झपाट्याने उसळी
टोमॅटोच्या दरात मागील आठवड्यात मोठी उडी दिसून आली. बाजारात दर 1858 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले. मागील आठवड्यात हा दर 1300 ते 1500 रुपयांच्या दरम्यान होता. ही वाढ 30 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान आहे. गरमीमुळे फळांची निकृष्टता आणि उपलब्धताही घटल्याने दर वाढले आहेत.
सोयाबीनचा दर 4323 वर स्थिर, मागणीमुळे किंचित वाढ
सोयाबीनचा दर मागील आठवड्यात 4323 रुपये प्रति क्विंटल इतका होता, जो याआधी 4240 रुपये होता. सुमारे 80 रुपयांची वाढ झाली असून यामागे स्थानिक तेलगिरणींनी खरेदी वाढवलेली असल्याचे दिसते. इतर कृषीमालांच्या तुलनेत सोयाबीनचा दर तुलनेने स्थिर राहिला आहे.
हळदीत तेजी कायम
हळदीच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात सरासरी दर 13600 रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला, जो त्याआधी 12171 रुपये होता. सुमारे 1400 रुपयांची वाढ नोंदवली गेली. यामागे हळदीचे कमी उत्पादन, प्रक्रिया उद्योगांकडून वाढती मागणी आणि निर्यातदारांकडून सक्रिय खरेदी हे घटक आहेत.
सद्यस्थितीत टोमॅटो आणि हळद या पिकांच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. कांदा आणि सोयाबीनच्या दरातही सकारात्मक हालचाल आहे. हवामानात बदल, उत्पादन खर्च, मागणी-पुरवठा तफावत यामुळे पुढील आठवड्यातही या पिकांच्या बाजारभावात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून विक्रीबाबत निर्णय घ्यावा, असे जाणकरांनी सांगितले आहे.