हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सध्या ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे . त्यापैकी ३७१ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. परंतु खरेदीसाठी १२ टक्के ओलाव्याची अट असल्याने आतापर्यंत केवळ चार हजार ७७० क्विंटलची खरेदी झाली. ओलावा कमी झाल्यावर सोयाबीनची आवक वाढल्यावर खरेदी केंद्रांची संख्याही वाढवण्यात येईल , अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केला. तर खुल्या बाजारामध्ये सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तेच्या मालाचा सरासरी भाव ४ २०० ते ४ ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. हा भाव हमीभावापेक्षा किमान ५०० ते ७०० रुपयाने कमी आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यंदा राज्यात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीला सरकारने परवानगी दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये १० लाख टनांची खरेदी होणार आहे. महाराष्ट्रासोबतच सोयाबीन उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशातही हमीभावाने खरेदी होणार आहे. मध्य प्रदेश १३ लाख साठ हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार आहे. तसेच कर्नाटक, राजस्थान, तेलंगणातही हमीभावाने खरेदी होणार आहे. त्यामुळे बाजाराला एक आधार असेल.
ओलाव्याची अट…
सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ओलाव्याची अट घातली आहे. सोयाबीनमध्ये किमान १२ टक्के ओलावा असल्याशिवाय खरेदी होणार नाही. परंतु सध्या बाजारामध्ये येणाऱ्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. तसेच पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन मध्ये ओलावा जास्त येत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे १२ टक्क्यांचा ओलावा असलेला माल खरेदी केंद्रांना कमी प्रमाणात मिळत आहे.
आतापर्यंतची खरेदी
सध्या १८ टक्क्यांपर्यंत बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा येत आहे. २० टक्क्यांपेक्षाही काही वेळा हा ओलावा जास्त राहतो, असे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले. परंतु खरेदीसाठी ओलाव्याची मर्यादा १२ टक्क्यांची आहे. परिणामी आतापर्यंत केवळ ४ ७७० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली, असे पणन विभागाने सांगितले.
खरेदी केंद्र वाढणार..
सध्या बाजारामध्ये १२ टक्के ओलावा असलेला माल कमी येत आहे. त्यामुळे आतापर्यंत ४७८ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे . त्यापैकी ३७१ केंद्रांवर खरेदी सुरू झाली. परंतु जसे बाजारात कमी ओलावा असलेल्या सोयाबीनची आवक वाढेल तसे खरेदी केंद्रांचीही संख्या वाढवण्यात आली आहे . दिवाळीच्या नंतर अजून खरेदी केंद्रे सुरू होतील, असेही पणन विभागाने स्पष्ट केले.