Gehu Chana Water Mangement: यंदा गहू, हरभऱ्याचे उत्पादन वाढवायचे आहे? असे करा पाणी व्यवस्थापन..

Water Management for Gehu and Chanaa crops in Rabi season गहू हरभऱ्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते.

गव्हासाठी (Gehu) असे करा पाणी व्यवस्थापनः
गव्हाच्या (Wheat) पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक पाळीत ८ ते १० सेंटिमीटर अशा तऱ्हेने एकूण ५ ते ६ पाळयांतून विभागून द्यावे.

पहिले ओलवणीचे पाणी सोडून नंतरचे ४ किंवा ५ पाणी पिकाच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेत द्यावे. पहिले पाणी मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी, दुसरे पाणी फुटवे फुटण्याचे अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.

तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी व चवथे पाणी दाणे चिकात असताना म्हणजे पेरणीनंतर ८२ ते ८५ दिवसांनी द्यावे.

याव्यतिरिक्त अजून एक जास्तीचे पाणी द्यावयाची व्यवस्था असेल तर ते पाणी पीक फुलोऱ्यात असताना ते दाणे चिकात असण्याच्या दरम्यान म्हणजे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी द्यावे.

हरभऱ्यासाठी (Chana) पाणी व्यवस्थापनः
हरभरा पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण २५ ते ३० सेंटीमीटर पाण्याची गरज असते.

हरभरा पिकाची पाण्याची ही गरज एकूण २ पाण्याच्या पाळयातून भागवावी. त्यासाठी पहिले पाणी पिकास फांद्या फुटताना म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि दुसरे पाणी घाटे भरताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

असे असले तरी हरभऱ्याच्या काही जाती विशेषतः विजय ही जात दिलेल्या पाण्याला अतिशय उत्तम प्रतिसाद देते. या जातीचे कोरडवाहू क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळते आणि बागायती म्हणून हे पीक घेतल्यास व त्याला ४ ते ५ पाण्याच्या पाळयात दिल्या तर विजय या जातीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते.

जास्तीच्या या २ ते ३ पाण्याच्या पाळ्या फुलोऱ्याच्या कालावधीत दिल्या तर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो, जास्त फुले लागतात, घाटयाची संख्या वाढते पर्यायाने भरघोस उत्पादन मिळते.

हरभरा पिकास जास्त प्रमाणात दिलेले पाणी सहन होत नसल्याने हरभऱ्याची लागवड सरी-वरंबा पद्धतीत टोकण पद्धतीने केल्यास आणि पिकास पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळते. मात्र हरभऱ्याचा फुलोरा घुवून जाऊ नये म्हणून फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकास सरी-वरंबा पद्धतीने पाट पाणी द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *