Lal kanda bajarbhav : मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, कळवण, मालेगाव, येवला, मनमाड, सिन्नर या कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांत कांद्याची आवक वाढल्याने लाल कांदयाच्या भावात सरासरी ३३०० रुपयांपर्यंत घसरण झाली. माञ तीन दिवसांपासून पुन्हा आवक घटल्याने भाव चढू लागले असून शनिवारी लाल कांदयाला लासलगाव बाजारात सरासरी ३७०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता.
दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अलवर आणि आझादपूर या देशांतील बाजारात दिनांक १ डिसेंबर ते ८ डिसेंबर या काळात कांद्याची आवक घटली असून सरासरी बाजारभाव ३ हजार ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हे बाजारभाव काहीसे वधारल्याने त्याचा परिणाम नाशिकसह राज्यातील बाजारावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील कांद्याची मागणी वाढणार असून भावही काहीसे वाढू शकतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील अलवर येथील लाल कांद्याची आवक मागच्या संपूर्ण आठवड्यात दर दिवशी सुमारे २ हजार क्विंटल इतकी राहिली. मागच्या आठवड्यात अलवर बाजारात एकूण कांदा आवक साडेआठ हजार क्विंटल इतकी झाली. तर किमान बाजारभाव १५०० रुपये तर सरासरी बाजारभाव ३ हजार ते ३१०० रुपये प्रति क्विंटल असा होता.
दिल्ली राज्यातील प्रसिद्ध असलेल्या आझादपूर मंडीमध्ये मागच्या संपूर्ण आठवड्यात कांदा आवक केवळ ४ हजार ७०० क्विंटल इतकीच झाली. कमीत कमी बाजारभाव २५०० रुपये तर सरासरी ३४०० रुपये असा आहे.
दरम्यान काल रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आळेफाटा बाजारात चिंचवडी कांद्याची सुमारे १४ हजार क्विंटल आवक होऊन किमान बाजारभाव २ हजार तर सरासरी बाजारभाव ४१०० रुपये प्रति क्विंटल असे होते.
आज दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी कांदा लिलाव सुरू झाले तेव्हा पुणे बाजारात लोकल कांद्याची सुमारे ११ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव ४८०० रुपये झाले तर पिंपरी बाजारात कांद्याला सरासरी ३२५० रुपये बाजारभाव मिळाले.












