soyabin Rate : देशात कच्च्या सोयाबीन तेलाची आयात दुप्पट झाली असून, त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या दरांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. परदेशातून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल येत असल्याने देशातील तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योग देशांतर्गत सोयाबीन खरेदी करण्यापेक्षा आयातीवर अधिक अवलंबून राहतात. परिणामी स्थानिक बाजारात सोयाबीनच्या किमती कमी होण्याचा धोका वाढतो आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही स्थिती धोकादायक ठरू शकते, असे जाणकरांचे मत आहे. कारण ज्या वेळेस देशात मोठ्या प्रमाणावर आयात होते, तेव्हा देशांतर्गत उत्पादकांचे उत्पादन मागणीतून बाहेर फेकले जाते. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव किंवा उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळणे अवघड होते. विशेषतः सध्याच्या काळात सोयाबीनची लागवड करणारे शेतकरी पुढील हंगामासाठी निर्णय घेत असताना ही अस्थिरता त्यांच्या निर्णयावर परिणाम करणार आहे. त्यातून यंदाच्या खरीपात लागवड घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या माहितीनुसार, चालू तेलवर्षाच्या (नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५) पहिल्या पाच महिन्यांत भारताने १९.११ लाख टन कच्च्या सोयाबीन तेलाची आयात केली. मागील वर्षी याच कालावधीत ही आयात ८.८२ लाख टन इतकी होती. या वाढीमागे प्रमुख कारण म्हणजे अर्जेंटिनाकडून आयातीत झालेली वाढ. अर्जेंटिनाकडून आयात ४.५० लाख टनांवरून थेट १२.१६ लाख टनांवर गेली. ब्राझीलमधून ३.२७ लाख टन आणि रशियाकडून १.६२ लाख टन तेल भारतात आले.
एकूण खाद्यतेल आयात मात्र थोडीशी घटली आहे. यंदा ५६.३९ लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले, जे मागील वर्षीच्या ५७.६५ लाख टनांपेक्षा थोडेसे कमी आहे. मात्र कच्च्या आणि परिष्कृत पाम तेलाच्या आयातीत घट झाल्याने ही भरपाई सोयाबीन तेलाने केली आहे.
कच्च्या पाम तेलाची आयात २५.९६ लाख टनांवरून १७.२३ लाख टनांवर आली आहे. परिष्कृत पामोलीनची आयात ८.८६ लाख टनांवरून ६.६२ लाख टनांवर घसरली आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताचे प्रमुख पाम तेल पुरवठादार आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करताना आयात व निर्यात धोरणांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. अन्यथा, दरवर्षी उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असल्याचे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे.












