सोयाबीनचा ‘फुले किमया’ हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला होता. आता याचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन केले जाणार आहे. या वाणाला राज्यासह देशभरात खूप मागणी असल्यामुळे विद्यापीठाने हे बीजोत्पादन नागालॅंड कृषी विद्यापीठाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे.
आदिवासी उपयोजनेंतर्गत नागालँड कृषी विद्यापीठाद्वारे फुले किमया या वाणाच्या बियाणांचे बीजोत्पादनासाठी वितरण होणार असून त्यासाठी नागालॅंड कृषी विद्यापीठाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १७.१६ क्विंटल बियाणांचा पुरवठा केला आहे.
सोयाबीन पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रामधील बहुतांश भागात झपाट्याने वाढत आहे. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र १९९०-९१ मध्ये २ लाख हेक्टर होते.२०२२-२३ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र ४९.०९ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित व संशोधित केलेल्या सोयाबीनच्या फुले किमयाचे १८५०, फुले दुर्वाचे ५६५ ,फुले संगमचे १५७५, व फुले कल्याणी या सोयाबीन वाणांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
यंदा खरिप हंगामात ५० क्विंटल पैदासकार बियाणे उत्पादित करण्यात आले आहेत . हे बियाणे खरीप २०२४ साठी शेतकरी गट/बीजोत्पादक कंपन्या,वेगवेगळ्या शासकीय संस्था (महाबीज, राष्ट्रीय बीज निगम), खाजगी बीजोत्पादक कंपन्यांना स्रोत बियाणे म्हणून विक्री केली जाणार आहे. यामुळे बीजोत्पादक साखळीमधून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे.सोयाबीन बियाणाला राज्यासह देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे.
१७ क्विंटल १६ किलो बियाणे नागालॅँड कृषी विद्यापीठाला देण्यात आली आहे . सांगली येथील विद्यापीठाच्या कसबे डिग्रस कृषी संशोधन केंद्राने तांबेरा प्रतिकारक्षम असा फुले किमया (केडीएस-७५३) हा वाण संशोधित केल्या नंतर तो सन २०२० मध्ये दक्षिण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू, ओरिसा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी शिफारशीत आणि अधिसूचित केला गेला.
महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त हा वाण इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे हे बीजोत्पादन बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके व नागालॅंड वाणाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे .
राज्यासह देशभरातून ‘फुले किमया’ हा सोयाबीनचा चांगला वाण असून त्याला मागणी आहे. त्यामुळे या वर्षी नागालॅंड राज्यातील कृषी विद्यापीठाच्या मदतीने बीजोत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे तेथील भागातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणार आहेत .
– डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी