खासगी दूध संस्थांनाही अनुदान; पण दरात घट वाचा सविस्तर ..

राज्यातील गाईचे दूध आणि दूध जन्य पदार्थांचे भाव घसरल्याने राज्यातील सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना ही प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी उशिरा घेण्यात आला.  वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीत सहकारी दूध संघाच्या दुधाला प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय झाला होता, मात्र काही तासातच खाजगी दूध संघांनाही अनुदान जाहीर करण्यात आले.

तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध संस्थांनी 29 रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे जाहीर केलेले असताना त्यात दोन रुपयाची घट करून 27 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.  34 रुपयांवरून 32 रुपये पुन्हा 29 रुपये जाहीर करून पुन्हा 27 रुपये दर निश्चित केले.

राज्यामध्ये गाईच्या दुधाचे दर उतरल्याने त्यांना उचित भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबवण्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते ,त्यानुसार प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते.

मात्र गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खासगी दूध संघांना अनुदान देण्याचा कुठलाही निर्णय झाला नव्हता मात्र अचानक रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून सहकारी आणि खाजगी दूध संघांना अनुदान देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरिता  किमान 27 रुपये प्रति लिटर दर संबंधित उत्पादकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा करणे बंधनकारक राहणार आहे.  त्याच्यानंतर राज्य सरकार मार्फत पाच रुपये अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतिपेक्षा प्रतिपॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करिता   ३० पैसे वजावट  करण्यात येणार आहे . तर प्रतिपॉइंट वाढीकरिता ३० पैसे वाढ करण्यात येणार आहे.  या योजनेसाठी बँक मार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे . सध्या राज्यात प्रतिदिन 149 लाख लिटर दूध संकलित होते.  त्यासाठी प्रति पाच रुपये अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधी करिता अंदाजे 230 कोटी रुपये अनुदान आवश्यक आहे. मात्र दूध संकलनानुसार यात वाढ किंवा घट होऊ शकते.

खाजगी दूध संघाचे संकलन जास्त.

राज्यात 43.19 लाख लिटर दूध हे सहकारी दूध संघामार्फत संकलन केले जाते, यासाठी 135.44 लाख रुपये अनुदानाची गरज आहे असे दुग्धविकास विभागाच्या प्रस्तावात सांगितले आहे . खाजगी दूध संघाकडून संकलित होणारे 105 लाख 61 हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते त्यामुळे अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे.

दूध संघाच्या प्रतिलिटर दरात कपात..

दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध संस्थांनी 29 रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते.  गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही विभागाने तसा प्रस्ताव ठेवला होता.  3.2 आणि 8.3 एसएनएफ गुणप्रतिकरिता २९  रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत असा प्रस्ताव दिला होता . मात्र शासन आदेशात 3.5 फॅट आणि ८.५ एसएनएफकरिता  27 रुपये दर देण्यात यावेत , असे आदेश दिले आहेत.

Leave a Reply