लवकर पूर्ण करा पूर्व हंगामी ऊसाची लागवड, खोडकिडा दिसल्यास असा करा बंदोबस्त..
सध्या राज्यात ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरु आहे. अनेक ठिकाणी ऊस लागवड आटोपली असली तरी काही ठिकाणी अजूनही उसाची लागवड सुरु झालेली नाही. त्यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विशेष कृषी सल्ला दिला आहे.
पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
खोड किडीचा प्रादूर्भाव
ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उसाची लागवड
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीतच करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणेच वापरावे. दर ३ ते ४ वर्षांनी ऊस बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३0 सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे.
यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची २५,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर १.५ ते २ फूट ठेवावे व सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी १३,५०० ते १४,००० रोपे लागतील.