
Take care animals : पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या कालावधीत ओलसर वातावरण, तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. योग्य व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नुकसान टाळता येऊ शकते.
शेळी पालनात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत शरीरावर परजीवींनी होणारा त्रास वाढतो. त्यामुळे परजीवी नियंत्रणासाठी वेळोवेळी औषधोपचार करणे आवश्यक आहे. नवीन जन्मलेल्या करड्यांचे जंतनाशन करावे. सर्व शेळ्यांना पीपीआर, आंत्रविकार व धनुर्वात यासाठी लसीकरण करून घ्यावे. पैदासक्षम शेळ्यांना अतिरिक्त खुराक द्यावा. पैदास हंगामासाठी बोकडांची तयारी करून ठेवावी. गाभण घालण्यासाठी माज ओळखण्यासाठी ‘माज ओळखणारा बोकड’ गोठ्यात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मेंढी पालन करताना जुलै महिन्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कळपातील मेंढ्यांना लाल लघवी व कावीळ या रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय सल्ल्याने तपासणी करून उपचार करावेत. नियमानुसार मेंढ्यांचे जंतनाशक औषधोपचार करावेत. गाभण मेंढ्यांची निगा राखावी. ९ ते १२ महिने वयाच्या कोकरांचे शरीराचे वजन घेऊन त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवावे. सर्व मेंढ्यांना धनुर्वातविरोधी लसीकरण करून घ्यावे.
कुक्कुटपालनात पावसाळा हा अतिशय संवेदनशील काळ मानला जातो. विशेषतः पिण्याच्या पाण्यावर भर देणे गरजेचे आहे. पावसात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. अशा पाण्यामुळे कोबड्यांना पाण्याद्वारे पसरणारे आजार होऊ शकतात. त्यामुळे पाण्यामध्ये योग्य प्रमाणात क्लोरीन अथवा स्टॅबिलायझ्ड पावडर मिसळावी. पाणी साठवण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून आतून व बाहेरून रंग लावावा. जर टाकी सिमेंटने बनवलेली असेल, तर त्याला अधूनमधून चुन्याचा थर लावावा. पावसाळ्यात पाण्याच्या टाकीवर झाकण बंद ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा पावसाचे पाणी त्यात जाऊन कोबड्यांना नुकसान होऊ शकते.
शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालन ही ग्रामीण भागातील महत्त्वाची जोडउद्योगे असून, पावसाळ्यात योग्य व्यवस्थापनामुळे जनावरांचे आरोग्य टिकवून उत्पन्नात सातत्य राखता येते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या काळात सावध राहून वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.