Important tips for the crop : भात, नाचणी आणि वरई पिकासाठी महत्त्वाच्या टिप्स…

Important tips for the crop : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील भात, नाचणी आणि वरई या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. इगतपुरी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या सल्ल्यानुसार, २५ जुलैनंतर काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा, लागवडीची वेळ आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

खरीप भात पिकाची लागवड अनेक ठिकाणी पूर्ण झाली आहे. सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, पावसाच्या उपलब्धतेनुसार पुनर्लागवड सुरु ठेवावी. पुनर्लागवडीनंतर १ ते ३ आठवड्यांत दोन वेळा खुरपणी करावी. भात खाचरात ५ ते ६ सें.मी. पाण्याची पातळी ठेवल्यास तण नियंत्रण चांगले होते. मात्र रोपे स्थिर होईपर्यंत पाणी १ ते २ सें.मी. पुरेसे आहे. लागवडीनंतर तीन दिवसांनी युरिया व डीएपीचे मिश्रण प्रत्येकी ७० किलो प्रति एकर प्रमाणे द्यावे. पावसाचा जोर लक्षात घेता या कामांमध्ये दोन दिवसांची उशीर केली तरी चालेल.

नाचणी पिकाची लागवड अद्याप काही भागांत पूर्ण न झाल्यास, गादीवाफ्यावर तयार केलेली २५ ते ३० दिवसांची रोपे वापरून लागवड पूर्ण करावी. रोपे २० सें.मी. ओळीतील अंतर व ४० सें.मी. ओळीत अंतर ठेवून लावावीत. लागवडीसोबत खत गोळ्यांच्या स्वरूपात देण्यात यावे. ४५:२२.५:०० नत्र, स्फुरद व पालाश अशा प्रमाणातील खतांचे ७५ टक्के प्रमाण गोळी स्वरूपात रोपाजवळ द्यावे. ही पुनर्लागवड ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी.

वरई पिकासाठी देखील अशाच प्रकारची तयारी आवश्यक आहे. २० ते २५ दिवसांची गादीवाफ्यावरील रोपे वापरून लागवड करावी. रोपे लागवडीपूर्वी थायरम या बुरशीनाशकात बीजप्रक्रिया करावी. यासोबतच अझोस्पिरीलम, फॉस्फोबॅक्टेरिया अशा जैविक घटकांची बीजप्रक्रिया करून उत्पादकता वाढवता येते. वरई लागवड ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावी.

या तीनही पिकांचे व्यवस्थापन करताना पाण्याचा योग्य निचरा, हवामानानुसार फवारणीचे नियोजन आणि खते वेळेवर वापरणे यावर भर द्यावा. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता आंतरमशागत व खत व्यवस्थापनातील कामे उघड्या हवामानात करावीत. योग्य नियोजनामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.