
Crop management : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि कांदा लागवडीसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. इगतपुरी येथील कृषी मौसम सेवा केंद्राच्या सल्ल्यानुसार, पुढील काही दिवस नाशिकच्या घाट क्षेत्रात जोरदार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेती कामांमध्ये काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे ठरते.
सर्वसाधारण सल्ला म्हणून जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भात पुनर्लागवड क्षेत्र, नव्याने लावलेली फळबाग आणि भाजीपाला क्षेत्रामधून जास्तीचे पाणी काढून टाकावे. उभ्या पिकांमध्ये पाणी साचणार नाही यासाठी निचऱ्याची सोय करावी. पाणी साचल्यास मुळांच्या आजारांची शक्यता वाढते. विशेषतः खरीप भात, नागली, वरई, मका, सोयाबीन, बाजरी, मुग आणि कापूस यांसारख्या पिकांमध्ये पाणी न साचण्यासाठी चर काढावेत.
ज्या भागांमध्ये कोरडवाहू जमीन आहे, विशेषतः मालेगाव, नांदगाव, येवला आणि सिन्नर भागात वातावरणातील ओलावा साठवण्यासाठी कंपार्टमेंट बंडी किंवा अन्य संरचनांची उभारणी करावी. याच भागांमध्ये पिण्याच्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
भाजीपाला लागवडीसाठी टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर आणि कोबी यांच्या रोपांची मुळे कीड व बुरशीपासून संरक्षणासाठी जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक व जिवाणू खताच्या द्रावणात बुडवून लागवड करावी. फ्लॉवर आणि कोबीसाठी सहा आठवड्यांचे रोपे लागवडीसाठी वापरावीत. खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला जसे की चुधी भोपळा, कारली, घोसाळी, तांबडा भोपळा यांची लागवड करता येईल. याशिवाय भेंडी व गवार यांचीही लागवड योग्य नियोजनात करावी. लागवडीनंतर भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचू देऊ नये.
कांदा रोपवाटिकेसाठी पाण्याची उपलब्धता असेल तर ४ ते ५ आठवड्यांची रोपवाटिका योग्य वाफ्यावर करावी. वाफ्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी निचरा होण्यासाठी योग्य रचना असलेले चर तयार करावेत. कांद्यात मर रोग होण्याची शक्यता असल्यामुळे, कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी. ही फवारणी पावसाच्या उघडीत करणे फायदेशीर ठरेल.
या सर्व उपाययोजनांमुळे खरीप हंगामातील भाजीपाला व कांदा लागवडीत संभाव्य नुकसान टाळून उत्पादन वाढवणे शक्य होईल. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीत वैज्ञानिक सल्ल्याचे पालन करणे ही यशस्वी शेतीसाठी अत्यंत आवश्यक बाब ठरते.