Rainy season : द्राक्ष आणि डाळिंब बागांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी..

राज्यातील द्राक्ष आणि डाळिंब पट्टशसह काही घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि उच्च आद्रतेमुळे फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांनी फळबागांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.

द्राक्ष बागांची काळजी:
द्राक्ष बागांमध्ये सध्या वेलींमध्ये जोमदार वाढ होत असून, काठीची वाढ अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे बगलफुटी अधिक प्रमाणात फुटतात, वेलींमध्ये गडद सावली तयार होते आणि परिणामी फांद्या परिपक्व होत नाहीत. अशावेळी काडी उगमस्थळी कोवळी राहते, अन्नद्रव्यांचा साठा होत नाही आणि काडी पोकळ राहत असल्याने नंतरचे घड कमी विकसित होतात किंवा संपूर्णपणे वाया जातात. त्याचप्रमाणे, गडद सावलीत आणि ओलसर हवामानात रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होतो.

या स्थितीत उपाय म्हणून द्राक्ष बागांमध्ये बगलफुली काढणे, फुली तारांवर व्यवस्थित बांधणे, वेलांचा छाटणीद्वारे संतुलन साधणे यासारख्या आंतरमशागत कामांना प्राधान्य द्यावे. फुलींवर स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून बोर्डो मिश्रण ०.७५ ते १% प्रमाणात फवारावे. वातावरणात जास्त ओलावा असल्याने रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून चार दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात. या फवारण्यांमुळे पुढील अनेक रोगनाशक फवारण्यांची गरज कमी होऊ शकते.

अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी पाणी साचलेल्या परिस्थितीत द्राक्षद्रव स्वरूपात ०-०-५० ही विद्राव्य खताची ४–५ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा दोन-तीन फवारण्या कराव्यात. वाफसा स्थितीत द्राक्षाच्या मुळाद्वारे खत देताना १.२५ किलो प्रति एकर या प्रमाणात SOP द्यावे. यासोबत मॅग्नेशियम सल्फेट १० किलो, फेरस सल्फेट ६–८ किलो जमिनीतून द्यावे.

डाळिंबाची काळजी:
डाळिंब बागांमध्ये सध्या बुरशीनाशकांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. स्कॅब, डिपिंग व कुजवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी डाळिंब फळधारणेच्या अवस्थेत १० ते १४ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. मॅण्डीप्रोपामिड, मेटीराम + पायराक्लोस्ट्रोबिन, प्रोपिकोनॅझोल, अॅझॉक्सीस्ट्रोबिन, झिनेब + हेक्झाकोनॅझोल, बोर्डो मिश्रण, कासुगामायसीन + कॉपर क्लोराईड यापैकी कोणतेही एक फवारणीसाठी निवडावे. प्रत्येक फवारणीत स्टिकरचा वापर करावा. पावसाच्या उघडीत फवारणी करणे फायदेशीर ठरेल.

या उपायांद्वारे शेतकरी द्राक्ष व डाळिंब पिकातील रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रभावीपणे करू शकतील आणि संभाव्य नुकसान टाळू शकतील.