Cotton purchase : अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे अधिक उत्पादन घेत असल्याने किमान हमीभाव योजनेंतर्गत कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उच्चतम उत्पादकतेनुसार हेक्टरी २३ क्विंटल कापूस खरेदी निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी २३ क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी केली जाणार असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना अधिक न्याय मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.
शेतकरी सुधारित सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पादन घेत असले तरी प्रत्यक्षात जादा उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणताना कमी उत्पादकता मर्यादेमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे ही मर्यादा वाढविण्याची मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पणन मंत्री जयकुमार रावल तसेच विविध लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी २३ क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले, ज्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.












