वसमत येथे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत होत आहे .जागतिक पातळीवरून आणि देश पातळीवर हळदीची मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
तसेच विदर्भ, मराठवाडा सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हळद संशोधन केंद्राबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पणन मंत्री अब्दुल सत्तार, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी,माजी खासदार हेमंत पाटील, केंद्रीय स्पाईस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया यावेळी उपस्थित होते.
एकीकृत हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे तयार होत आहे. या केंद्रासाठी आजच्या बैठकीत ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा प्रकल्प तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
हळदीचा वापर औषध निर्मितीसाठी आणि दैनंदिन जीवनात केला जातो. त्यामुळे जगभरातून हळदीला मोठी मागणी आहे. हळद या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो .
हळद हे नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे नगदी पीक आहे . मुख्यमंत्र्यांनी हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश यावेळी दिले. या केंद्रास शासकीय अभिसरण योजनांचा लाभ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जीआय मानांकन वसमत हळदीला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
या संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे, गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, देशभरामध्ये ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्या हळदीचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते.
देशातील जागतिक दर्जाचा हा एकमेव प्रकल्प आहे.स्थानिक शेतकऱ्यांची हळद या माध्यमातून निर्यात केली जाईल, तसेच बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी मदत होईल, असे हळद केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.