ladki bahin yojna: लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीमुळे लांबला होता, मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला. तर सुमारे १२ लाखांवर महिलांनी नव्याने नोंदी केल्यावर त्यांच्या खात्यात एकूण सर्व हप्त्यांचे मिळून ९ हजार रुपये जमा करण्यात आले होते.
मध्यंतरी ही योजना बंद होणार अशा अफवाही पसरल्या होत्या. मात्र या अफवा असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने केले होते. आता ज्या संदर्भात आपल्याला उत्सुकता आहे, ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार ही आहे.
तरी मग तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यात हा हप्ता बहिणींच्या खात्यावर येणार असल्याची आनंदवार्ता सरकारने दिली आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.












