Godavari ghore : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प प्रगतीपथावर..

Godavari Ghore : कोकणातील पाण्याचे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा प्रकल्प आता प्रगतीपथावर असून, या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कोरडवाहू भागात सिंचनाची शक्यता वाढणार असून, पाणीटंचाईमुळे होणारे शेतीचे नुकसान कमी होणार आहे.

या प्रकल्पाच्या कामांचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वेक्षणाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्वे वेळेत पूर्ण झाल्यास पुढील निविदा प्रक्रिया लवकर सुरू होऊन प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पाच्या माध्यमातून या कामांना जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभले आहे. या योजनेतील कामे कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, सर्वेक्षणाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त एजन्सी नेमण्याची शक्यता असून, जलदगतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे उद्दिष्ट आहे.

या पाण्याचा वापर कृषीसाठी होणार असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. विशेषतः पावसाच्या अनिश्चिततेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता सिंचनाची हमी मिळणार असून, उत्पादनक्षमता वाढणार आहे.

बैठकीत राधानगरी धरणाचे गेट आणि सांगली-कोल्हापूर बंधाऱ्यावर बॅरेज बांधण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच, पवना धरण पर्यटन प्रकल्पात पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून सुविधा उभारण्याचा निर्णय झाला.

कोकणातील जलसंपदा गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा हा प्रकल्प म्हणजे केवळ पाण्याचे पुनर्वाटप नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारण्यात येत असलेली नवजीवन योजना आहे.