Demand for fruits : कृत्रिम पद्धतीने फळे पिकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; शेतकऱ्यांच्या फळांची मागणी वाढणार…

Demand for fruits : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कृत्रिम रंग व कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर थांबवण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष तपासणी मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेचा फायदा थेट नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने फळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या फळांना बाजारात अधिक मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही व्यापारी किंवा अन्न व्यवसाय करणारे फळे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरतात, ज्यामुळे फळांचा रंग आकर्षक वाटतो, पण त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होतो. ही कृत्रिम प्रक्रिया आता एफएसएसएआयने गंभीरपणे घेतली असून, अशा प्रकारचे साठवणूक किंवा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक पद्धतीने फळे पिकवणाऱ्या आणि फळांचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांना या कारवाईमुळे दिलासा मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनात रासायनिक घातकता नसल्यामुळे ग्राहकांचा कल अशा फळांकडे वाढण्याची शक्यता आहे. तसेच ग्राहकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता वाढत असल्याने, शुद्ध आणि नैसर्गिक फळांचे मूल्य भविष्यात अधिक वाढू शकते.

एफएसएसएआयने इथिलीन गॅसच्या नियंत्रित वापरासंदर्भात मानक संचालन प्रक्रिया जाहीर केली असून, त्याच्या वापराने फळे सुरक्षितरीत्या पिकवता येतात. अशा पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात अधिक विश्वासार्हतेचा फायदा मिळू शकतो.

शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात कोणतेही कृत्रिम रसायन वापरू नये, यामुळे त्यांच्या फळांची गुणवत्ता टिकून राहते आणि ग्राहकांचा विश्वासही वाढतो. विशेषतः निर्यातक्षम फळांची मागणी वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत शाश्वत स्थान मिळवण्यासाठी ही कारवाई शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरू शकते.

एफएसएसएआयच्या या मोहिमेमुळे केवळ ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहणार नाही, तर नैसर्गिक आणि पारंपरिक शेती पद्धतींना बळ मिळेल, असा विश्वास फलोत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.