Weather update : देशभरात हवामान बदलाचे स्पष्ट संकेत दिसून येत असून, केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मॉन्सूनच्या आगमनासाठी पुढील चार ते पाच दिवसांत अनुकूल स्थिती तयार होत आहे. हवामान विभागाच्या मते, सध्या मॉन्सूनची उत्तर मर्यादा 5 अंश उत्तर अक्षांश पासून 21 अंश उत्तर अक्षांशापर्यंत पोहोचली असून, येत्या काही दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या मॉन्सून अरब सागरात 5°N/60°E पासून 21°N/95°E पर्यंत पसरलेला आहे. त्याचा प्रभाव दक्षिण अंडमान समुद्र, मालदीव, कोमोरीन क्षेत्र, दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागरावरही दिसून येत आहे. त्यामुळे केरळसह दक्षिण भारतातील भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात विशेषतः कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी आणि गोव्यात प्रत्येकी 8 सें.मी., कोल्हापुरात 3 सें.मी. पावसाची नोंद झाली. तर नाशिक शहर आणि परिसरात काल सायंकाळी अवघ्या काही मिनिटांत ३० से.मी. पावसाची नोंद झाली. पुण्यातही जनजीवन पावसाने विस्कळीत झाले. अनेक शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो पिकांचे नुकसान झाले.
दरम्यान या पावसामुळे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहिले. मराठवाड्यात वीज कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून, यात शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे काही भागांत झाडे पडण्याच्या घटना, शेतीमालाचे नुकसान, तसेच वाहतुकीवर परिणाम झाला आहे. स्थानिक हवामान केंद्राने शेतकऱ्यांना आणि नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून, उघड्यावर काम करणाऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
देशाच्या इतर भागांबद्दल बोलायचे झाल्यास, ईशान्य भारतात म्हणजेच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे सातत्याने जोरदार पावसाची शक्यता असून, 21 ते 26 मे दरम्यान काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांमध्ये विभागनिहाय पावसाचा अंदाज पुढीलप्रमाणे आहे :
कोकण आणि गोवा: येथे 21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, 25 आणि 26 मे रोजीदेखील पावसाची शक्यता कायम आहे. या काळात किनारपट्टी भागांमध्ये जोरदार वारे आणि वीजांचा प्रकोपही जाणवेल.
मध्य महाराष्ट्र: 21 ते 23 मेदरम्यान दक्षिण भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, गाठ भागांत विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
मराठवाडा: 21 आणि 22 मे रोजी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेती पिकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असून, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
विदर्भ: 21 ते 24 मेदरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांसह वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता असून, उन्हाचे प्रमाणही कमी होणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचे असतील. अवकाळी पावसामुळे शेती, वाहतूक, आणि नागरी व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांना पीक संरक्षणाची उपाययोजना करावी लागणार आहे. यासोबतच जनतेने हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता पाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.












