agricultural products : महाराष्ट्रातील विविधतेने नटलेली आणि दर्जेदार कृषी उत्पादने जगभरात लोकप्रिय ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरात (यूएई), व्हिएतनाम आणि सायप्रस या देशांसोबत कृषी मालाच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नुकतीच राज्याच्या पणनमंत्र्यांनी संबंधित देशांच्या प्रतिनिधींची चर्चा केली आहे.
यूएई हे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमधील एक प्रमुख देश असून तेथे अन्न व कृषी मालाची मोठी मागणी आहे. विशेषतः फळे, भाजीपाला, धान्ये आणि प्रक्रिया केलेले अन्न या उत्पादनांना तेथे चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. भारत आणि यूएई यांच्यातील मजबूत व्यावसायिक संबंध, तसेच यूएईमधील मोठी भारतीय लोकसंख्या यामुळे महाराष्ट्राच्या उत्पादकांसाठी निर्यात वाढवण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
व्हिएतनाममध्ये अलीकडच्या काळात आहारपद्धतीत मोठे बदल झाले असून, अन्न प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ताजे व प्रक्रिया केलेले अन्न, तृणधान्ये, मसाले, फळे व भाजीपाला यांना तेथे अधिक मागणी आहे. शिवाय व्हिएतनाममध्ये औषधी, स्वच्छ ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातही व्यापाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कृषी उद्योजक व निर्यातदारांनी या बाजारपेठेकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.
सायप्रससारखा छोटा पण उच्च उत्पन्न असलेला देशही दर्जेदार अन्नपदार्थांबाबत जागरूक आहे. येथील अर्थव्यवस्थेत स्थैर्य असून, अन्न व कृषी उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील फळे, भाज्या, प्रक्रिया अन्न आणि फुले यांसारखी उत्पादने सायप्रससाठी उपयुक्त ठरू शकतात.
या देशांमधील बदलत्या गरजा आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने उत्पादनाची गुणवत्ता, प्रक्रिया आणि प्रमाण यांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते.












