success story : सांगोल्याच्या या तरुणांने फुलवले फळपिकांचे नंदनवन….

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मुख्यत्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीच्या निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते.

दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सांगोल्याची एक ओळख आहे. याच भागात एका तरुण शेतकऱ्याने आपली वडिलोपार्जित शेतीत काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते शेतकरी म्हणजे महेश असबे. महेश हे आपल्या आजोबांपासून चालत आलेल्या परंपरागत शेती व्यवसाय पुढे नेण्याचे काम करत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रामुख्याने डाळिंब, बोर, सिताफळ, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट इत्यादी फळपिके ते त्याच्या शेतात घेतात. महाराष्ट्रमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाचनाची आवड व नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा या जोरावर 2009 साली ग्रीन ॲपल बेर लागवडीचा महाराष्ट्र मध्ये सर्वात पहिला यशस्वी प्रयोग महेश यांनी केला.

शेतीविषयक अभ्यास करून शेतीची यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास.. 

शेती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामाचा वारसा कायम ठेवण्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीला व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी कृषी अभियांत्रिकी विभागांमध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच शेती क्षेत्रामध्ये प्रगतशील अशा इस्राईल देशामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली व शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. अतिशय कमी पाणीसाठा व अतिउष्ण प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आशादायी शेती फुलवून शकतो हा विश्वास तिथे संपादन करून परत येवून शेतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

नवनवीन प्रयोगाची प्रेरणा जप्त 2013-14 साली ड्रॅगन फ्रुट या विदेशी फळांची त्यांनी लागवड केली. त्यांनी व्हाईट तसेच रेड अशा दोन्ही प्रजातीची लागवड केली. कमी पाण्याची गरज, कोरडे वातावरण, हलक्या प्रतीची जमीन, रोगराई कमी, द्राक्ष व डाळिंब पिकांचा तुलनेत कमी औषध फवारणी, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी न पडता प्रत्येक वर्षी हमखास व भरघोस उत्पादन असा सर्व बाजूनी फायदेशीर ठरेल असे पीक असल्यामुळे या फळ पिकांची निवड केली. सध्या 50 एकर बागायती क्षेत्र असून विविध फळांची यशस्वी लागवड केली आहे.

शेतीमध्ये विविधता जोपासत अनेक देशी विदेशी फळांची लागवड केली ज्यामध्ये प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुट (पांढरा, लाल, पिवळा) ग्रीन ॲपल बेर, कश्मीरी ॲपल बेर(ग्रीन), सिडलेस बेर, अवो काडो, गोड चिंच, पोमेलो (आफ्रिकन संत्री), वॉटर ॲपल , सिताफळ, VNR पेरू, ब्लॅक पेरू, थाई पेरू, थाई लिंबू, चिकू, द्राक्ष, आंबा इत्यादी फळपिकांची यशस्वी लागवड करून अकोला गावामध्ये शेती क्षेत्रातील नंदनवन उभे केले. बदलत्या काळानुसार बदलती पिके निवडल्यामुळे हे प्रयोग यशस्वी झाले. रुक्मिणी फार्ममधे उभे असलेले नंदनवन पाहण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातून हजारो शेतकरी बांधवांनी भेट दिली आहे.

रुक्मिणी फार्ममध्ये वीस प्रजातीवर काम करण्याचा मानस.. 

महेश म्हणतात की, ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मुख्यत्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीचा निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते. ड्रॅगन फ्रुटच्या बागेचे एकूण यश झाडांचा आकार, सरचना व वाढीनंतरचा घेर, सूर्यप्रकाशाचा प्रवेश,हवेचे पुरेसे अभिसरण, पाण्याची उपलब्धता, जमिनीची खोली, जमिनीचा उतारा या बाबीवर अवलंबून आहे. ड्रॅगन फ्रुट ची तीन एकरापासून केलेली सुरुवात आजअखेरीस 18 एकर वर पोहोचली आहे. त्यामध्ये जबो लाल, लाल-लाल, सियाम लाल, पांढरा ड्रॅगन, व्हिएतनाम लाल इत्यादी प्रजातीची लागवड केली आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक पिकात कुशल व ज्ञानी व्हावे यासाठी मी व्हिएतनाम, इस्राईल , थायलंड, आदी देशांचे अभ्यासद्वारे केले आहेत. तसेच भारतीय ड्रॅगन फ्रुटला जगभरात पोहोचविण्यासाठी दुबई, ओमान, इराण या देशाचे दौरे केले व बाजारपेठेचा अभ्यास केला. 2020 साली दुबईला
ड्रॅगन फ्रुट ची पहिली निर्यात केली. 2019 साली महाराष्ट्रमध्ये सर्वप्रथम पिवळा ड्रॅगन फ्रुट या प्रजातीची यशस्वी लागवड केली. येत्या काळामध्ये रुक्मिणी फॉर्ममध्ये आणखी वीस प्रजातीवर काम करण्याचा मानस आहे.

शेतकऱ्यांचा मागणीसाठी रुक्मिणी नर्सरीची उभारणी.. 

महेश पुढे सांगतात की, निसर्गातील बदलाचा कमी फटका, कमी पाणी, रोग व किडीचा कमी प्रादुर्भाव, तसेच एकेरी मिळणारा अधिक नफा या कारणामुळे या फळपिकास पर्यायी पीक म्हणून अधिक पसंती मिळत आहे. लागवडीचा वाढता कल पाहता ड्रॅगन फ्रुटची योग्य लागवड पद्धत निवडणे, योग्य अंतर, छाटणी व्यवस्थापन यासारखा तांत्रिक बाबीवर विशेष भर देणे आवश्यक आहे व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. म्हणून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुटचा लागवडी संदर्भात असणाऱ्या अडचणी सोप्या व्हाव्यात म्हणून सात एकरवर विविध लागवड पद्धतीचे डेमो प्लॉट उभे करण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष प्लॉटवर भेट देऊन त्यांच्या शंकाचे निरीक्षण केले जाते. ड्रॅगन फ्रुट पिकासाठी असणारी चर्चासत्रे, सहली, कार्यशाळा स्वत: आयोजित करायला सुरुवात केली व गावातील शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचावण्यास मदत झाली. त्यातून प्रेरणा घेऊन माझा मार्गदर्शनाखाली भारतभर आत्तापर्यंत पाचशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली आहे. रुक्मिणी फॉर्ममधील सर्व शेतीविषयक अनुभव व माहिती कमीतकमी कालावधी मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमाचा वापर अतिशय सोयस्करपणे केला जात आहे.

रुक्मिणी फॉर्मच्या मीडिया अकाउंटच्या माध्यमातून मी माहिती पोहोचविण्याचे काम करत आहे. त्यामध्ये सोशल मीडियाचा अर्थातच फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन याद्वारे माहिती दिली जाते आणि त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपे पुरविणे या ध्यासातून आणि शेतकऱ्यांचा मागण्या पूर्ण करण्यासाठी रुक्मिणी नर्सरीची उभारणी केली.

युवा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न.. 

सध्याचा प्रयोगशील विचारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना तंत्र मार्गदर्शन त्यांच्या उत्पादनाची योग्य दरात खरेदी करणे,शेतकऱ्यांना त्याच्या हक्काची बाजारपेठ मिळवून देणे यासाठी एक युवा शेतकरी म्हणून ते सदैव प्रयत्नात आहे. भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्यामध्ये नवीन चेतना जागृत करून शेती क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *