एक महिना या वर्षीचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन पूर्ण झाला आहे. बाजारामध्ये दर्जेदार हळदीची आवक होत आहे व हळदीला चांगला दर ही मिळत आहे. त्यामुळे हळदीच्या दरात एका महिन्यात प्रतिक्विंटल दोन हजारांनी वाढ झाली आहे . हळदीला गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जानेवारीच्या मध्यापासून देशासह राज्यात हळद काढणीला सुरुवात झाली आहे,परंतु काढणीला फारशी गती नव्हती. त्यामुळे बाजारामध्ये दररोज हळदीच्या चार ते पाच हजार पोत्यांची (एक पोते ६० किलोचे) आवक होत होती. हळद काढणीला फेब्रुवारी महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून गती आली होती. त्यामुळे बाजार समितीत दररोज सुमारे १५ हजारांहून अधिक पोत्यांची फेब्रुवारीच्या मध्यापासून आवक होत आहे. हळदीची अंदाजे दोन लाख पोत्यांची विक्री एका महिन्यात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
फेब्रुवारीमध्ये या वर्षीचा हळद विक्रीचा हंगाम सुरू झाला. हळदीच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १३ हजारांपासून ते २३ हजार रुपयांपर्यंत हंगामाच्या सुरुवातीला दर मिळत होता. तसेच , मागीलवर्षीच्या तुलनेमध्ये हळद विक्रीच्या सुरुवातीपासून हळदीला चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादक विक्रीसाठी नियोजन करत आहेत. पाऊस कमी असला तरी , काटेकोर नियोजन करत शेतकऱ्यांनी दर्जेदार हळद पिकवली आहे. बाजारात त्यामुळे दर्जेदार हळद विक्रीला येऊ लागली आहे. हळदीला चांगली मागणी आहे त्यामुळे दर ही चांगले आहे. हळदीला दर स्पर्धेतून मिळत आहे.
सध्या कर्नाटकातील व पश्चिम महाराष्ट्रतील हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येत आहेत.बाजार समितीत हळदीची अद्याप जळगाव , नांदेड, वसमत, यासह अन्य भागातील आवक सुरू झाली नाही. परपेठ (पर जिल्हा, परराज्य) हळदीची आवक मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. हळद उत्पादक शेतकऱ्यामध्ये हळदीच्या दरात सुधारणा झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. येत्या काळामध्ये हळदीचे दर असेच टिकून राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बाजार समितीचा मार्केटिंगसाठी पुढाकार
निजामबाद ,नांदेड, वसमत,जळगाव, हिंगोली, या भागांमधील हळद उत्पादकांना आकृष्ट केले जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीने हळदीचे मार्केटिंग समाज माध्यमांचा वापर करून करण्याचा निर्णय घेतला असून . त्याप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यास बाजार समितीने सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीत हळद विक्रीसाठी राज्यासह परराज्यातील हळद उत्पादक शेतकरी येतील, अशी आशा आहे.
प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रतिक्विंटल)
लगडी…२२ हजार ते २४ हजार
गड्डा…१६ हजार ते १७५००
पावडर क्वॉलिटी…१६ हजार ते १७ हजार
उच्च प्रतिची…२० हजार ते २४ हजार
मध्यम…१८ हजार ते १९ हजार
सांगली जिल्ह्या मध्ये हळद ही परंपरा आहे. सांगली बाजाराकडे हळद पुन्हा यावी, सर्वच घटकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. इथे हळदीला सर्वाधिक दर मिळतो, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. इथे दक्षिण भारतामधील शेतकरी हक्काने येत असतात . त्यांना सर्व सुविधा देण्यात येतील .
– सुजय शिंदे, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.
यंहा हळद चांगल्या दर्जाची आहे. हळदीला चांगले दर मिळत असल्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी बाजारामध्ये घेऊन येऊ लागले आहेत. हळदीला उठावही चांगला आहे. हळदीच्या दरामध्ये फारशी तेजी किंवा मंदी होण्याचे चित्र दिसत नाही .
– गोपाळ मर्दा, हळद व्यापारी सांगली.












