Smart farming : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राज्यातील शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. मंत्रालयात नुकतीच एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील विविध भागधारक, तज्ज्ञ, नामांकित उद्योगसमूह आणि स्टार्टअप्सनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेचा उद्देश राज्यात एआयचा शेतीमध्ये कसा प्रभावी वापर करता येईल, यावर सखोल विचारमंथन करणे हा होता. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकार दोन्ही कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या कार्यशाळेत डेटा गुणवत्ता, माहितीची देवाणघेवाण, स्थानिक पातळीवरील तांत्रिक सुविधा, शेतकऱ्यांना एआय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन, तसेच स्टार्टअपसाठी आधारभूत व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली. या नव्या धोरण मसुद्यात शेतीतील उत्पादनात वाढ, उत्पादन खर्चात घट, आणि वास्तविक वेळेतील डेटावर आधारित निर्णयक्षमतेस मदत होईल, अशी धोरणात्मक चौकट तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.
याशिवाय, या धोरणाद्वारे विविध डेटासेट्सचे एकत्रीकरण, शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार, पुरवठा साखळीतील सुधारणा, संशोधन व नवोपक्रमांना चालना, आर्थिक समावेशन व शेतकऱ्यांच्या क्षमतेचा विकास यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कार्यशाळेत पोक्रा प्रकल्पाचे परिमल सिंग, कृषी विभागाचे संतोष कराड, तसेच जागतिक बँकेसह वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, बायर, महिंद्रा अँड महिंद्रा, नॅसकॉम, फ्लिपकार्ट, सह्याद्री फार्म्स यांसारख्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध तज्ज्ञांनी डेटा सुरक्षा, धोका व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने उपाययोजना सुचविल्या.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एआयचा वापर हे केवळ संकल्पनाच राहणार नाही, तर प्रत्यक्षात शेतीचे स्वरूप बदलण्याची सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या दिशेने राज्य शासनाकडून धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहेत.












