
Kanda Rate : आज शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला किमान २५०० रुपये कमाल २८०० तर सरासरी २६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र या ठिकाणी आवक कमी झालेली आहे. या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढताना दिसून येत आहे. काल गुरूवार दिनांक ६ मार्च रोजी राज्यात एकूण १ लाख ८५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. मात्र बुधवारी हीच कांदा आवक २ लाख ९७ हजाराच्या आसपास पोहोचली होती. त्यामुळे बाजारभावावर थोडासा परिणाम झाला आहे. दुसरीकडे राज्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढायला लागली असून बाजारभाव सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल मिळताना दिसत आहेत.
नगर जिल्ह्यात काल उन्हाळी कांद्याला सरासरी १९५० रुपये बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला. या जिल्ह्यात सद्या उन्हाळी कांदा आवक जास्त असून काल अहिल्यानंतर जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची आवक २० हजार क्विंटल इतकी झाली, तर नाशिक जिल्हयात सुमारे साडे नऊ हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली.
गुरूवार दिनांक ६ मार्च रोजी लासलगाव बाजारात लाल कांद्याची सुमारे ११ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ७०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव २५२८ रुपये आणि सरासरी बाजारभाव २२८० रुपये मिळाला. तर उन्हाळी कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पोळ कांद्याला नाशिकच्या बाजारात २५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. संगमनेरला १५ हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक होऊन १४७५ रुपये बाजारभाव मिळाला.
पुणे जिल्हयात कांद्याला सरासरी १८०० रुपये ते २२०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याला १६५० रुपये बाजारभाव मिळताना दिसत आहे.