![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/कांद्याच्या-भावावर-कशाचा-दबाववाचा-सविस्तर-.webp)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडच्या वायद्यामध्ये शुक्रवारपासून नरमाई आली आहे . सोयाबीनचे वायदे 13.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे 450 डॉलर प्रति टनावर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तीन आठवडे सुधारणा दिसल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये नरमाई आली. तर देशातील बाजारातही सोयाबीनची भाव पातळी नरमली होती. आज बाजारात सोयाबीनला प्रती क्विंटल 4700 ते 5000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
देशातील बाजारामध्ये कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली असून, अद्यापही भाव सरकारने कांदा निर्यात शुल्क लावण्याआधीच्या पातळीवर कांदा अद्यापही पोचला नाही. तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी दिसत आहे,त्यामुळे मागील काही दिवसापासून कांदा भावात सुधारणा झाली असून सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 3500 ते 4000 चा भाव मिळत आहे. देशातील कांद्याची टंचाई कायम आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणखीन सुधारू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
बाजारामध्ये हिरव्या मिरचीला उठाव वाढला आहे. तसेच बाजारातील आवकही स्थिर आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून आहे . काही बाजारात आवक वाढल्याने नरमाई देखील दिसून आली. पण दरातील नरमाई जास्त नव्हती. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी ३ हजार ४ हजारांचा भाव मिळत आहे. या पुढील पिकासाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल त्यामुळे हिरव्या मिरचीच्या पिकालाही फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे ,त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजित राहू शकतात.
टोमॅटोच्या भावात मागील तीन दिवसांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. बाजारातील टोमॅटो आवक दिवसेंदिवस काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल १ हजार ८०० ते 2000 रुपयांचा भाव मिळत आहे. तरीही टोमॅटोचे भाव उत्पादन खर्चाच्या पातळीवर असल्याचे शेतकरी सांगत आहे. टोमॅटो पिकाला सध्या बदलत्या वातावरणात आणि कमी पावसाचा फटका बसत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी भावा-अभावी प्लॉट सोडून दिले होते.